जळगाव : ईडी पथकाने केलेल्या तपासणी दरम्यान जळगाव येथील राजमल लखीचंद या सराफी फर्म मधून 87 लाख रुपये रोख आणि दागिने सिल करण्यात आले आहेत. स्टेट बॅंकेकडून घेण्यात आलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी ईडीकडून आरएल समुहाची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीअंती ही कारवाई करण्यात आली आहे.
आरएल फर्म नातेवाईकाच्या नावे असून ही कारवाई करणे चुकीचे असल्याचे या समुहाचे संचालक इश्वरलाल जैन यांनी म्हटले आहे. आर एल समुहाने घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी स्टेट बॅंक आणि आर एल समुह परस्पर विरोधी दावे करत आहेत. थकीत कर्जाचा विषय मार्गी लागत नसल्यामुळे स्टेट बॅंकेने दिल्ली सीबीआयकडे तक्रार केली. त्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभुमीवर गुरुवारी ईडी अधिका-यांच्या पथकाने तपासणी केली.
बराच वेळ सुरु असलेल्या या तपासणी पथकाने आर एल ज्वेलर्स शो रुम मधील 87 लाख रुपयांची रोकड अअणि दगिने सिल करण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई चुकीची असल्याचे संचालक इश्वरलाल जैन यांनी म्हटले आहे. कायदेशीर मार्गाने दाद मागणार असल्याचे देखील जैन यांनी म्हटले आहे. ईडीच्या अधिका-यांनी इश्वरलाल जैन आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मनिष जैन या दोघांचे जवाब नोंदवले आहेत. अधिक माहिती घेण्यासाठी दोघा पिता पुत्रांना ईडी कार्यालयात हजर रहावे लागणार आहेत. त्यांना तसे समन्स बजावण्यात आले आहेत.