महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध – अतुल जैन


जळगाव दि. ५ प्रतिनिधी – महाराष्ट्रासह देशात महिलांच्या क्रिकेटला प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून जळगाव येथे महाराष्ट्र राज्य महिला १९ वर्षाखालील क्रिकेट प्राथमिक संघाचे सराव शिबीर व निवड चाचणी स्पर्धेच्या सामन्यांचे आयोजन सुरू आहे. महिला क्रिकेटपटूंना आवश्यक ती सुविधा देण्याचा मानस व्यक्त करित अनुभूती स्कूल चे मैदान क्रिकेट स्पर्धाेंसाठी कायम उपलब्ध असेल असे प्रतिपादन अतुल जैन यांनी केले.

महिला क्रिकेट संघाचे निवड चाचणी सामने जळगावात अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर आजपासून सुरूवात झाली. उद्गघाटन प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपक्स सदस्य अतुल जैन बोलत होते. यावेळी क्रीडांगण पूजन व नाणेफेक डॉ. भावना जैन यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) सुयश बुरकुल, सहाय्यक प्रशिक्षक सोनम तांदळे, वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मंदार दळवी, सहाय्यक प्रशिक्षक सानिया डबीर, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, निवड समितीचे सदस्य रेखा गोडबोले, मनिषा लांडे, रेश्मा धामणकर, स्नेहल जाधव, व्यवस्थापक चंदा राणी-कांबळे यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षा आतील प्राथमिक क्रिकेट संघाची निवड जाहिर झाली असून त्यांचे निवड चाचणीचे सामनांमध्ये राज्यभरातून ४५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. एकदिवसीय सामन्यांमध्ये महिला खेळाडूंना आपल्या कौशल्य दाखविले. वरूण देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here