जळगाव : पाच हजाराची लाच स्विकारतांना वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकासह कंत्राटी सेवकास जळगाव एसीबी पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमराव लहू नाईक असे व्यवस्थापकाचे तर आनंद नारायण कडेवाल असे कंत्राटी सेवकाचे नाव आहे.
यावल तालुक्यातील तक्रारदाराने शेळी पालन करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज प्रकरण वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळ जळगाव येथील कार्यालयात सादर केले होते. त्यापैकी पहिला हप्ता 75 हजार रुपयांचा मंजूर झाला होता. उर्वरित 25 हजार रुपये मंजूर करून देण्यासाठी व्यवस्थापक भिमराव लहू नाईक याने स्वत:साठी तिन हजार रुपये आणि कंत्राटी सेवक आनंद कडेवाल याने स्वत: साठी दोन हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. दोघांना लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे तसेच सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.ना, सुनिल वानखेडे, पो.कॉ. प्रणेश ठाकुर पो.कॉ. राकेश दुसाने आदीनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांना पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.सचिन चाटे आदींनी सहकार्य केले.