जळगाव दि. ८ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनसाठी २०१९ ते २२ ही आर्थिक वर्षे व्यवसायाच्यादृष्टीने कसोटीची होती. ग्रीक संस्कृतीमधील ‘फिनिक्स’ जशी सूर्याकडे उंच भरारी घेतो व स्वत:च्या राखेतून अस्तित्व निर्माण करून पुन्हा उंच भरारी घेतो. त्याप्रमाणे जैन इरिगेशन सिस्टिम्स कंपनीने भरारी घेतलेली आहे. भविष्यातील काळ जैन इरिगेशनमधील प्रत्येक सहकारी, भागभांडवलदार, वितरक, हितचिंतक यांना आनंदाची वार्ता घेऊन येईल. असे आश्वासक प्रतिपादन जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन यांनी केले.
जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क, बांभोरी येथील प्रशासकीय इमारतीसमोरील पटांगणावर झालेल्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थितांशी सुसंवाद साधत होते. यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अतुल जैन, वरिष्ठ संचालक पद्मभुषण डॉ. डी. आर. मेहता, स्वतंत्र संचालक घनश्याम दास, स्टुॅच्युटोरी ऑडिटर नविंद्रकुमार सुराणा, सीएफओ बिपीन वलामे, कंपनी सचिव अवधुत घोडगावकर, जैन फार्मफ्रेश फुड्सचे संचालक अथांग जैन यांच्यासह ऑनलाईन पद्धतीने इतर संचालक मंडळ उपस्थित होते. ‘स्क्रुटीनिअर’ (प्रॅक्टीसींग कंपनी सेक्रेटरी) म्हणून मुंबईच्या अमृता नौटीयाल उपस्थित होत्या. सर्वसाधारण सभेच्या आरंभी अध्यक्ष अशोक जैन यांनी गत वर्षात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहिली, व सभेसमोर कंपनीतील संचालक मंडळातील सदस्यांची नियुक्ती यासह नऊ ठराव मांडले.
‘जे स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवतात, पडले तरी धैर्य बाळगतात, सावरतात, वाढण्याचा ध्यास घेतात, तेच चिकाटीने पुन्हा उंच भरारी घेतात.’ ही संकल्पना स्पष्ट करताना कंपनीच्या गत आर्थिक वर्षात घडलेल्या सकारात्मक बाबींवर चर्चा केली. आर्थिक शिस्त, कृषिक्षेत्रातील गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञान व शेतकऱ्यांबद्धल असलेली बांधिलकी यामुळेच कंपनीला वेगाने आर्थिक प्रगती साध्य करता आली. भारत देखील वेगाने प्रगती करत आहे. जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. आता तो पहिल्या तीन मध्ये समावेश होईल इतकी वेगाने प्रगती सुरू आहे. या वेगाला अनुसरून आपल्याही प्रगतीचा वेग वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कंपनीने सर्व घटकांनी कार्यक्षमतेचा विश्वासपूर्ण वापर करावा. अल्पभुधारक शेतकऱ्याला आर्थिक भरभराटीत आणण्याचे मूल्याधिष्ठित ध्येय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंचे होते; तोच वारसा जपत जैन इरिगेशन मधील प्रत्येक सहकारी, भागभांडवलदार, वितरक, हितचिंतक कार्य करीत आहे. अॅग्रीकल्चर इनपुटचे तंत्रज्ञान पोहचत असताना पुढच्या पिढीचे भविष्य सुकर होण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर करून विकास साधण्यासाठी कंपनीने आपल्या व्यवसायाचे दोन विभागात पुनर्गठन केले आहे. यात ‘सस्टेनेबल अॅग्रीटेक सोल्यूशन (SAS)’ आणि ‘पाईपिंग अॅण्ड बिल्डींग प्रोडक्ट सोल्यूशन (PBPS)’ यातून कंपनीला व्यवसायाच्या व्यापक संधी आहेत. यासह कंपनी आगामी काळात शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रभावी ठरणाऱ्या टिश्यूकल्चर रोपांमध्ये बटाटा, कॉफी, काळिमिरी, पपई, टॉमोटो यासह सात ते आठ नव्या पीकांच्या संशोधना संदर्भात कंपनीने लक्ष केंद्रित केले असल्याचे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले.
कंपनीची सर्वांगिण प्रगती कशी व कोणत्या कारणांमुळे होतेय यावर भाष्य करताना ज्येष्ठ संचालक डॉ. डी. आर. मेहता यांनी सांगितले की, भारतातील ७० टक्के लोकसंख्या कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. याच क्षेत्राच्या उन्नतीसाठी जैन इरिगेशन ठिबक, टिश्यूकल्चरच्या माध्यमातून काम करत आहे. भवरलाल जैन यांच्या प्रेरणेतून कठिण काळातही सहकारी, व्यवस्थापन, भांडवलदार यांच्या सकारात्मक प्रयत्नामुळेच गतवर्षाच्या मानाने आर्थिकदृष्ट्या भक्कम वाटचाल कंपनीने केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य कंपनीने उपलब्ध करून दिल्यामुळे गतवर्षापेक्षा शेअर्सची किंमतदेखील दुप्पट झाली आहे. कर्ज पुर्नगठन करताना बँकांच्या असलेल्या अटीशर्तींपेक्षा पुढे जाऊन कंपनीने पुर्नगठन केले असा व्यवहार मी चार दशकात प्रथमच अनुभवल्याचे डॉ. डी. आर. मेहता यांनी सांगितले.
यासह इतर संचालकांनी आपल्या प्रतिक्रीया पुढीलप्रमाणे नोंदविल्यात. कंपनी व्यवस्थापनाने भागधारकांसमोर अभूतपूर्वक व चमत्कारिक बदल करून दाखविले त्यामुळे व्यवस्थापनाचे कौतुक केले पाहिजे असे संचालक बास मोहरमन यांनी सांगितले. संचालिका राधिका परेरा यांनी सांगीतले की, लवचिकता, पुनरुत्थान आणि उत्कृष्ट सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी लागणारी चिकाटी हे जैन इरिगेशनचे मुख्य गुण आहेत. टिश्यूकल्चरमधील व्यवसाय वाढीची दृष्टी कौतुकास्पद आहे आणि याचे निश्चितच उज्ज्वल भविष्य असेल, जैन इरिगेशन म्हणजे धैर्य, कार्य आणि उत्कृष्टतेचा प्रवास आहे.
शाश्वत शेती आणि बांधकाम साहित्यासाठी उपाय देण्यारे दोन विभाग करण्याची कल्पना उत्कृष्ट आहे. फिनीक्स पक्षी प्रमाणे उठणे आणि पडणे आणि नंतर वेगाने उडणे हा प्रत्येक सहकाऱ्यामधील विश्वास आणि आत्मविश्वास दाखवितो. कंपनीतील प्रत्येक सहकाऱ्याचे समर्पण आणि परिश्रम अनुकरणीय आहेत. शाश्वत शेती समाधानामध्ये कंपनी अतुलनीय उंची गाठेल असा विश्वास आहे. अशी प्रतिक्रीया संचालक डॉ. एच. पी. सिंग यांनी दिली. आभार अतुल जैन यांनी मानले. राष्ट्रगीताने कंपनीच्या सर्वसाधारण सभेचा समारोप झाला. यावेळी रायसोनी मॅनेजमेंट कॉलेज, अनुभूती निवासी स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.