मुंबई : सन २०१६ मध्ये एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. या नोटबंदीनंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली गेली. सामान्य लोकांसाठी ही नोट त्रासदायक ठरत होती. सन 2019 -20 नंतर आरबीआय ने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई केली नाही. ही नोट चलनातून नाहिशी होते की काय अशी शंका व चर्चेला वाव मिळाला होता.गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने दोन हजाराची एकही नोट छापली नाही.
गेल्या दोन वर्षांत ५ हजार ५१२ लाख संख्येने दोन हजाराच्या नोटांचे वितरण घटले. मूल्यात्मक विचार केल्यास सन २०१८ मध्ये एकूण नोटांच्या ३७.३ टक्के अर्थात सहा लाख ७२ हजार ६४२ कोटी रुपयांच्या मूल्याच्या दोन हजाराच्या नोटा चलनात होत्या . मार्च २०२० मध्ये हे प्रमाण घसरुन पाच लाख ४७ हजार ९५२ कोटी रुपये इतके झाले.दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण घटले असले तरी २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांची मागणी देखील वाढली आहे. सन २०१८ मध्ये ३७ हजार ०५३ कोटी रुपये मूल्याच्या २०० कोटी रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. हे प्रमाण मार्च २०२० पर्यंत १ लाख ०७ हजार २९३ कोटी रुपयांच्या मूल्यापर्यंत गेले आहे.