जळगाव : रेल्वे अपघातातील अती गंभीर तरुणावर जळगाव येथील सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या पुढाकाराने शिघ्रगती उपचार मिळण्यास मदत झाली आहे. या तरुणास जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून मुंबई परेल येथील केईएम रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
अमोल थोरात हा तरुण रेल्वे अपघातात जखमी झाल्याने त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आपात्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची अवस्था अती गंभीर असल्याने तसेच त्याच्यावरील प्लॅस्टिक सर्जरीसह इतर उपचारासाठी किमान दहा ते बारा लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत होता. याबाबत सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना माहिती मिळाली.
सामाजिक कार्यकर्ता गुप्ता यांनी लागलीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे स्विय सहायक रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर लागलीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष गनी मेमन यांच्याशी संपर्क साधून विनाशुल्क रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले. रुग्णास तातडीने केईएम रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली साकार झाल्या. रुग्णास मुंबई येथे रवाना करण्यात आले असून सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी संबंधीत सर्वांचे आभार मानले आहेत.