जळगाव, दि. २२ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे तिसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक, निर्माते, अभिनेते पद्मश्री सतिश आळेकर (पुणे) यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी कवयित्री सुमती लांडे (श्रीरामपूर), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अशोक कोतवाल (जळगाव) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी सिताराम सावंत (इटकी ता. सांगोला, सातारा) यांना जाहिर झाला आहे. ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव’ पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.
साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. शोभा नाईक, सौ. ज्योती जैन हे ऑनलाईन उपस्थित होते. तर सदस्य ज्येष्ठ साहित्यीक रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. सुरवातीला कविवर्य ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यीक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.
जैन इरिगेशनचे कल्याणकारी अंग असलेल्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे बहिणाई पुरस्कार, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बिजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी नाटक, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहे. तर ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव’ हा व्दिवार्षिक पुरस्कार असून २ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे याचे स्वरूप असेल. पहिल्या पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार राम सुतार, दुसरा जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा तिसरा पुरस्कार प्रसिद्ध लेखक, निर्माते, अभिनेते सतिश आळेकर यांना जाहिर करण्यात आला आहे.
‘कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्याकडून सृजनशील लिखाणाचे कार्य घडावे यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन इरिगेशनतर्फे सुरूच असते. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे ‘कला-साहित्य पुरस्कार’ जाहिर करताना आनंद होत आहे.’ – अशोक जैन, अध्यक्ष, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन
पुरस्कार प्राप्त साहित्यीकांचा परिचय – सतिश आळेकर – ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्यांना जाहिर झाला ते सतिश आळेकर यांनी पुण्याच्या ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे काम केले आहे. याशिवाय रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी काम केले आहे. फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ‘ओळख’, ‘काळोख’ या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ‘मिकी आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ‘महापूर’, ‘महानिर्वाण’ आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. सतीश आळेकर यांनी ‘चिंटू’, चिंटू-२, ‘व्हेंटिलेटर’, भाई,भाई-२, मी शिवाजी पार्क, अय्या, चि व चि सौ कां, राजवाडे अँड सन्स, स्माईल प्लिज, हाय वे, देऊळ बंद, जाऊंद्याना बाळासाहेब इत्यादी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. रंगभूमीप्रमाणेच ‘जैत रे जैत’ चित्रपटाची पटकथा, ‘देखो मगर प्यार से’ ही दूरदर्शन मालिका, ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत. रंगभूमीवरील कारकीर्द आणि नाट्यकृतींचा आढावा घेणारे ‘गगनिका’ हे आत्मकथन चर्चेत आहे.
2) सुमती लांडे – साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या सुमती लांडे यांचे कमळकाचा, वाहेत अंतर, कमळकाचा: कावप्रत्यय कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. साहित्य क्षेत्रात कवयत्री, लेखिका,संपादक, प्रकाशक, ग्रंथ प्रसारक, ग्रंथ वितरक म्हणून सुमती लांडेचे कार्य आहे. शब्दालय प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी ग्रंथप्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. सुमती लांडे यांनी स्त्री वाद, स्त्री-पुरूष नातेसंबंध, वाड्मयीन चळवळी आणि दृष्टीकोन, पुरूष आकलनातला-अनुभवातला यांचे संपादन केले आहे.
3) सिताराम जगन्नाथ सावंत – इटकी ता. सांगोला जि. सातारा येथील रहिवाशी सिताराम सावंत रयत शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत. ‘नामदार’, ‘लगीन’, ‘देशोधडी’, ‘भुई भुई ठाव दे’ अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कादंबरी, ‘काव्यार्य’ संपादन व ‘पांढर’ आणि ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा कथासंग्रहाने सिताराम सावंत यांनी मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवले आहे. शेतकरी, शिक्षक आणि लेखक हा प्रवास करताना शेतमालकांचे जमिनीचे ‘काळीज’ हातांमधून गेल्यानंतर त्यांच्या मनांचा तीव्रकोमल कोलाहल टिपणारी ‘भुई भुई ठाव दे’ कादंबरी व ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’ हा कथासंग्रह सध्या मराठी विश्वात बहुचर्चित आहे. स्वतः अभियंता अर्हताप्राप्त असणाऱ्या या लेखकाने कठोर विचार करून आणि विवेकाची नीट मशागत करून ‘स्थावरजंगम’ विषयावर कादंबरीच्या माध्यमातून वाचा फोडली आहे.
4) अशोक कोतवाल – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य राहिलेले अशोक कोतवाल (जळगाव) यांचे ‘मौनातील पडझड’, ‘कुणीच कसे बोलत नाही’, ‘नुसताच गलबता’, ‘खांदे सुजलेले दिवस’, हे कवितासंग्रह तर ‘प्रार्थनेची घंटा’, ‘सावलीचं घड्याळ’, ‘दालगंडोरी’ हे ललित लेखसंग्रह, ‘घेऊ या गिरकी’ हे बालकविता यासह पुणे सुविद्या प्रकाशनाचे ‘खानदेशचे काव्यविश्व’ हे संपादन केले आहे. यातील ‘प्रार्थनेची घंटा’, ‘झडीचा पाऊस’, ‘दालगंडोरी’ ह्या साहित्यांचा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश आहे.