जळगाव दि. २२ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान सुरू आहे. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बलाढ्य पश्चिम बंगाल संघाला नमवत महाराष्ट्र संघाने फायनलमध्ये दिमाखात धडक मारली. उद्या (दि. २३) दुपारी १.३० वाजता दोघांमध्ये अंतिम सामना होईल. तत्पुर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी तामिळनाडू विरूद्ध त्रिपुरा यांच्यात सकाळी ९.३० वाजता सामना खेळविला जाणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टि-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ च्या आजच्या दिवसाची सुरवात त्रिपुरा विरूद्ध तामिळनाडू यांच्यात खेळविला गेलेल्या सामन्याने झाली. तामिळनाडूने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्रिपुरा बिनबाद ३९ धावा असताना सातव्या षटकात पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती न घेतल्याने सामना थांबवून दोघंही संघाला प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
यानंतर दुपारी पश्चिम बंगाल विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात अंतिम सामना रंगला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगालच्या मिता पॉल ३५ धावा व कशिश अग्रवाल १९ या सलामीच्या खेळाडूंनी चांगली सुरवात करून दिली. मात्र मधल्या फळीतील फलंदाजी कोळमडल्याने निर्धारीत २० षटकात सर्वबाद १०९ धावा बंगालला करता आल्यात. महाराष्ट्राकडून उत्कृष्ट गोलंदाजी मुक्ता मगरे हिने केली. तिने ४ षटकात ४ विकेट घेऊन बंगालचे कंबरडे मोडले. तिला अनुजा पाटील, ईशिता खळे, आदित्य गायकवाड प्रत्येकी १ विकेट साथ मिळाली. प्रत्युत्तरात महाराष्ट्र संघाची सुरवात धडाकेबाज झाली. मात्र संघाच्या २२ धावांच्या स्कोरवर किरण नवगिरे १० धावा करून आऊट झाली. यानंतर शिवाली शिंदे १९ धावा, तेजल हसबनिस ३१ धावा, अनुजा पाटील १९ धावा आणि मोक्याच्या क्षणी मुक्ता मगरे हिने नाबाद २२ धावांची खेळी करून महाराष्ट्र संघाला विजय मिळवून दिला. महाराष्ट्र संघाने १९.२ षटकांत ४ विकेटच्या मोबदल्यात ११३ धावा केल्यात व बंगालवर ६ विकेटने मोठा विजय प्राप्त केला. ४ विकेट घेणाऱ्या व २२ धावांची उपयुक्त खेळी करणाऱ्या मुक्ता मगरे हिला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. जैन परिवाराच्या सदस्या सौ. शोभना अजित जैन यांच्याहस्ते मुक्ता मगरे हिला चषक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष रेखा गोडबोले, अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी यांची उपस्थिती होती.