जळगाव : जळगाव जिल्ह्यातून दोघा सराईत गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख आणि आमीर उर्फ गुडन शेख महमद अशी दोघा गेंदालाल मिल परिसरातील राहणा-या या गुन्हेगारांची नावे आहेत. जळगाव जिल्हयांत टोळीने गुन्हे करणा-या इसमांविरुध्द मुं.पो.का.क. 55 प्रमाणे हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीअंती दोघा गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख आणि आमीर उर्फ गुडन शेख महमद या दोघांविरुध्द जळगांव शहर पो.स्टे. ला एकूण पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे दोघांनी टोळीने केले आहेत. समाजात शांतता सुव्यवस्था ठेवण्याबाबत या दोघांविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यातआली होती. मात्र त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. दोघा गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव जळगांव शहर पो.स्टे. चे पो.निरीक्षक अनिल भवारी, सफौ बशिर तडवी, पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोकॉ अमोल ठाकुर, पोना प्रफुल धांडे आदींनी तयार केला. या प्रस्तावावरील कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी केले.