जळगाव : उज्वला आवास योजनेच्या नावाने बॅनर व स्टॉल लावून महिलांना आकर्षित करुन त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन देण्याची बतावणी करुन त्यांची लाखो रुपयात फसवणूक करणा-या चौघांविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (रा. आव्हाणी ता. धरणगाव जिल्हा जळगाव ह.मु. रामेश्वर कॉलनी जळगाव), राहुल गणेश सपकाळे (रा. सुप्रिम कॉलनी जळगाव), विजय गंगाधर भोलाणे व करण विजय भोलाणे (दोन्ही रा. नवीन बी.जे. मार्केट बी. विंग जळगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
या चौघांनी संगनमताने उज्वला आवास योजनेचे स्टॉल व बॅनर लावून महिलांना आकर्षित केले. महिलांकडून त्यांचे रेशनकार्ड, आधारकार्ड, फोटो व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तसेच प्रत्येक महिलेकडून दिडशे रुपये असे अंदाजे बाराशे महिलांकडून 1 लाख 80 हजार रुपये जमा केले. या फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायीक तथा आरटीआय कार्यकर्ता शैलेंद्र काशिनाथ सपकाळे यांनी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत.