जळगाव : शेतीच्या व्यवहारात फसवणूक तसेच खून झाल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन आदेशानुसार महिलेच्या मृत्यूप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबीबाई गणेश राठोड असे बोढरे ता. चाळीसगाव येथील मयत महिलेचे नाव आहे. 10 सप्टेबर 2017 रोजी तसेच 16 मार्च 2016 ते 17 सप्टेबर 2017 या कालावधीत हा गुन्हा घडला असून गुन्हा 27 ऑक्टोबर 2023 रोजी दाखल करण्यात आला आहे. मदन उत्तम राठोड हे फिर्यादी आहेत.
पंकज नगीनदास छाजेड यांच्याशिवाय इतर दहा ते बारा जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज छाजेड (रा. चाळीसगाव) हे या प्रकरणातील खरेदीखत लिहून घेणारे आहेत. या घटनेतील मयत अंबीबाई राठोड यांना शेतीच्या व्यववहाराच्या तसेच पैशांच्या कारणावरुन पंकज छाजेड, दलालीचे काम करणारे अफजल खान पठाण (रांजणगाव ता.चाळीसगाव) आणि दादासाहेब पुंडलीक पाटील (रा. लोणजे ता. चाळीसगाव) अशा तिघांविरुद्ध मयत अंबीबाई यांना शिवीगाळ व मारहाण तसेच शेतात गाडून टाकू, कुणाला पत्ता देखील लागणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. याशिवाय गुलाब बाबू राठोड, कैलास उखर्डू चव्हाण, पुंजा रामरामा धुमाळ यांच्याविरुद्ध शेतीच्या व्यवहाराची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याचा आरोप आहे. इतर चौघांविरुद्ध मयत अंबीबाई राठोड हिस मारुन टाकल्यानंतर दवाखान्यात नेल्याचा आरोप आहे.
उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडील याचिका क्रं. 1458/2019 मधील निर्णयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. भाग 5 गु.र.न. 387/23 भा.द.वि. 302, 420, 323, 504, 506, 34 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. ज्ञानेश्वर जाधव करत आहेत.