जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वापरत असलेल्या वाहनाचा मुद्दा सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी खणून काढला आहे. जिल्हाधिकारी वापरत असलेले वाहन हे सरकारी नसून खासगी व भाडे तत्वावर घेतले असल्याचे उघडकीस आले आहे. या खासगी वाहनावर सरकारी लाल दिवा लावला जात असून शासनाच्या महसुलाची चोरी केली जात असून शासनाच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचे दीपककुमार गुप्ता यांचा आरोप आहे.
पुर्वीचे वाहन जुने झाले होते त्यामुळे आपण नवे शासकीय वाहन एका डिपार्टमेंटच्या शिल्लक फंडातून खरेदी केले असल्याचे पत्रकारांसोबत बोलतांना जिल्हाधिका-यांनी काही महिन्यांपुर्वी म्हटले होते. ज्यावेळी पाचोरा येथील एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळी पत्रकार मंडळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यासाठी गेली होती. त्यावेळी नियोजन भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पत्रकारांसमवेत वार्तालाप करतांना जिल्हाधिका-यांनीच आपल्या वाहनाचा विषय पत्रकारांना सांगितला होता. गतीमान सरकारच्या कार्यकाळात गतीमान निर्णय असा शब्दप्रयोग देखील त्यांनी त्यावेळी केला होता.
सध्यस्थितीत जळगावचे विद्यमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे सरकारी कामकाजासाठी MH19 EA 8429 हे चारचाकी वाहन वापरत आहेत. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी काही माहिती मिळवली आहे. त्या माहितीनुसार जळगावचे वर्तमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वापरत असलेले MH19 EA 8429 या क्रमांकाचे वाहन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून भाड़ेतत्वावर प्राप्त केले आहे. या वाहनाची जळगाव उप प्रादेशिक परिवहन विभागकडे AASK ERECTORS PRIVATE या नावाने नोंदणी करण्यात आली आहे. हे वाहन M/S Diya Cars, Aurangabad या वाहन एजन्सीकडून दिनांक 6 ऑगस्ट 2023 पासून भाडेतत्वावर घेतल्याचे समजते. या वाहनाची जळगाव उप प्रादेशिक परिवहन विभागाकडे 9 ऑगस्ट 2023 रोजी नोंदणी झाली आहे.
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना मिळालेल्या माहितीनुसार हे वाहन व्यक्तिगत नावाने रजिस्टर करण्यात आले आहे. या वाहनाचा कमर्शियल वापर करुन शासनाच्या डोळ्यात धुळफेक करुन शासकीय महसुलाची चोरी केली जात असल्याचा गुप्ता यांचा आरोप आहे. हे एक खाजगी वाहन असून देखील त्या वाहनावर शासकीय वाहन दर्शवून त्यावर लाल दिवा लावण्यात आला आहे जे परिवहन विभागाच्या नियमाविरुद्ध आहे.
दीपककुमार गुप्ता यांनी असा मुद्दा उपस्थित केला आहे की MH19 EA 8429 हे वाहन जर कमर्शियल आहे तर त्या वाहनावर पिवळी नंबर प्लेट का नाही? आणि हे वाहन जर खासगी आहे तर त्याला भाडे तत्वावर का देण्यात आले आहे? आणि या वाहनावर लाल दिवा का? आणि कोणत्या नियमानुसार लावण्यात आला आहे? या सर्व बाबी लक्षात घेत MH19 EA 8429 हे वाहन शासनाने जप्त करुन त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. या वाहनामुळे होत असलेल्या शासनाच्या महसूल चोरीला लगाम लावून संपूर्ण टॅक्ससह दंड वसूल करण्यात यावा अशी देखील मागणी गुप्ता यांनी केली आहे.