जळगाव : बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता चौधरी वाड्यात ‘बहिणाई स्मृती’ येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा होत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी हा दिवस “विश्व लेवा गणबोली दिन” म्हणूनही साजरा होतो. बहिणाबाईंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिक श्रोत्यांनी, विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले.
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जयंती व स्मृतिदिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. या औचित्याने कविसंमेलन, शालेय विद्यार्थ्यांचे बहिणाबाई चौधरींच्या कवितांचे सादरीकरण, बहिणाबाईंच्या गाण्याचे गायन, साहित्यिकांच्या चौधरी वाड्यास भेटी असे विविध उपक्रम राबविले जातात. बहिणाबाईंच्या स्मृतिंना उजाळा दिला जातो. शिक्षीत नसूनही जीवन विकासाचे तत्त्वज्ञान सांगणारी गाणी आणि कविता आपल्या आजुबाजुला घडलेल्या घटनांचा संबंध बोली भाषेत सहजतेने उलगडून दाखविलेला आहे.
बहिणाबाईंच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे एरंडोल येथील मराठी साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांच्यासह जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या रिसर्च डीन डॉ. गीता धरमपाल या उपस्थित राहणार आहेत. बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, समस्त चौधरी परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.