शेतीच्या वाद उठला जीवावर – फावड्याचा घाव बसला पित्यावर

जळगाव : शेतीच्या वादातून मुलाने बापाला ठार केल्याची घटना पहुर पोलिस स्टेशन हद्दीत शेंदुर्णी ता. जामनेर येथील तरंगवाडी येथे घडली. या घटने प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला मुलाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना दामू बडगुजर (82) असे मयत पित्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. खून करुन पसार झालेला मुलगा कैलास बडगुजर यास शनिवारी रात्रीच पाचोरा येथून पहुर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.  

दोघा पिता पुत्रात शेतीचा वाद कित्येक दिवसांपासून सुरु होता. मिळालेल्या माहितीनुसार नाना बडगुजर यांचे तरंगवाडी शिवारात शेत होते. घटनेच्या दिवशी शनिवारी सकाळी नाना बडगुजर व त्यांचा मुलगा कैलास बडगुजर (रा. वाडी दरवाजा, शेंदुर्णी) हे दोघेही  शेतात हजर होते. त्यावेळी दोघांमधे शेतीवरुन वाद झाला.

वादाचे पर्यावसन मुलगा कैलास याने पिता नाना बडगुजर यांच्या डोक्यात कुट्टी भरण्याचे लोखंडी पावडे टाकण्यात झाले. या घटनेत नाना बडगुजर हे जमीनीवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान कैलास बडगुजर याचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी हे दुसऱ्या शेतात काम करत असतांना त्यांनाघटनेची माहिती समजली. दोघेही घटनास्थळी दाखल झाले. दोघांनी पाहिले असता त्यांचे आजोबा नाना बडगुजर निपचीप पडले होते. दरम्यान कैलास बडगुजर याने घटनास्थळावरुन पलायन केले. पळून गेलेल्या कैलास बडगुजर याचा मुलगा विशाल बडगुजर याने दिलेल्या फिर्यादीनुसार पहुर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार कैलास यास पाचोरा येथून रात्रीच अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दिलीप पाटील, सहायक फौजदार शशिकांत पाटील, हे.कॉंस्टेबल प्रशांत विरनारे, पो.कॉंस्टेबल विजय आणि गोपाल गायकवाड यांनी आरोपीस अटक केली. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here