साखरपुड्यानंतर महिला वकीलाची फसवणूक

जळगाव : साखरपुडा झाल्यानंतर हुंडा स्वरुपात चारचाकी वाहन तसेच ऑफीस तयार करण्याकामी अधिकच्या रकमेची मागणी करणा-या पतीसह इतरांविरुद्ध महिला वकिलाने चोपडा शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  चोपडा तालुक्यातील या महिला वकिलाचे सध्या नाशिक जिल्ह्यात वास्तव्य आहे.

चोपडा तालुक्यातील महिला वकील नाशिक येथील न्यायालयात वकीलीचा व्यवसाय करत होती. सन 2022 मधे अमित रामचंद्र हस्तेकर या नाशिक येथील तरुणासोबत या महिला वकीलाचे प्रेमसंबंध निर्माण झाले. एकमेकांच्या नातेवाईकांच्या सहमतीने दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार चोपडा शहरात नातेवाईकांच्या समक्ष जानेवारी 2023 मधे त्यांचा साखरपुडा झाला.

28 जानेवारी 2023 रोजी दोघांचे लग्न निश्चित झाले असतांना भावी पती अमित हस्तेकर याच्यासह त्याचे वडील रामचंद्र हस्तेकर, आई अंजली रामचंद्र हस्तेकर, व मामा किरण उपासणी (मुंबई) अशांनी महिला वकिलास हुंडा स्वरुपात चारचाकी वाहन आणि भावी पती अमित हस्तेकर याचे नाशिक येथील ऑफीस बनवण्यासाठी अधिकच्या रकमेची मागणी केली. या मागणीस महिला वकील व तिच्या आई वडीलांनी नकार दिला. त्याचा राग आल्याने व साखरपुडा झाला असतांना देखील अमित हस्तेकर याच्यासह त्याचे आई वडील व मामा यांनी लग्नास नकार दिला. याप्रकरणी महिला वकिलाने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप राजपुत करत आहेत.     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here