जळगाव : जळगाव येथील सार्वजनीक बांधकाम विभागात दोन गटातील वाद उफाळून आल्याने तलवारी बाहेर निघाल्याची घटना आज घडल्याचे वृत्त समजते. तथापी या घटनेची पोलिस दप्तरी नोंद झालेली नाही तसेच ज्याठिकाणी ही घटना घडली त्याठिकाणी सीसीटीव्ही देखील नसल्याचे समजते. याप्रकरणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शासन दप्तरी तक्रार केली असून या परिसरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे.
आज 12 डिसेंबर 2023 रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास दोन गटात जळगाव आणि एरंडोल येथील दोन गटात वाद झाल्याचे म्हटले जात आहे. या वादाची परिणीती तलवारी निघण्यात झाली असे म्हटले जात आहे. याप्रकरणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी स्थानिक जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार करुन सार्वजनीक बांधकाम विभागातील परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी देखील केली आहे. यापुर्वी देखील पिस्तुल काढण्याच्या घटना घडल्या असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. आजच्या घटनेचे अनेक जण साक्षीदार असले तरी ते घाबरलेले असल्यामुळे कुणी पुढे येत नसल्याचे म्हटले जात आहे.