जळगाव : जळगाव शहराच्या प्रताप नगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैर व्यवहार सुरु असून त्याबाबत माहिती देण्यासाठी सेवेक-यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या अध्यात्मिक सेवा केंद्रात देणगीच्या रुपात येणारी रक्कम बेकायदेशीरपणे दुसऱ्या संस्थेत घेऊन जाणे, त्याचा कुठलाही हिशेब न दाखविणे हे चुकीचे असल्याचा आरोप यावेळी सेवेक-यांनी केला. याबाबत आपण पोलिस अधिक्षकांसह संबंधीत यंत्रणेला तक्रारी देखील केल्याचे सेवेक-यांनी यावेळी म्हटले. मात्र आपल्याला पोलिस विभागाकडून सहकार्य मिळाले नसल्याचे सेवेक-यांचे म्हणणे आहे.
या गैर व्यवहाराबाबत माहिती देण्यासाठी नितीन चव्हाण, रवींद्र कदम, पंकज पाटील, प्रवीण चौधरी, संदीप व्यास, दिनकर देशमुख, बाळू पाटील आदी सेवेकरी हजर होते. प्रतापनगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राचे सदस्य भरतसिंग मोहनसिंग पाटील हे स्वयंघोषित अध्यक्ष, तर रमेश बाबूराव परदेशी हे स्वयंघोषित उपाध्यक्ष म्हणून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
प्रत्येक आठवड्याला त्रंबकेश्वर येथील गुरुपीठ संस्थेचे वाहन जळगावच्या केंद्रात येते आणी दानपेटीतील रक्कम एका थैलीत बेकायदेशीररित्या भरुन नेले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दानपेटीत किती रक्कम होती याचा हिशेब कोणत्याही सेवेक-याला दिला जात नाही. एका स्वतंत्र संस्थेच्या मालकीचा पैसा बेकायदा घेऊन जाणे हा एकप्रकारे दरोडा असल्याचे सेवेक-यांचे म्हणणे आहे. याशिवाय क्युआर कोड, पावती पुस्तकाद्वारे देखील गुरुपिठाच्या सेवेक-यांनी अवैधपणे पैसे स्विकारले आहेत असा आरोप या पत्रकार परिषदेत नितीन चव्हाण, रविंद्र कदम, पंकज पाटील आदींनी यावेळी केला.
जळगाव जेडीसीसी बॅंकेच्या गणेश कॉलनी शाखेत या संस्थेचे खाते आहे. या खात्यात तत्कालीन अध्यक्षांनी त्यांचा मुलगा व सेवेक-यांना हाताशी धरुन बेकायदा रक्कम काढली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. यामधे स्वयंघोषित अध्यक्ष भरतसिंग पाटील यांनी 10 लाख 88 हजार 722 रुपये, त्याचा मुलगा विरेंद्र भरसिंग पाटील याने 9 लाख 87 हजार आणि श्री गुरुपिठाकडून 22 हजार 500 रुपये परस्पर काढून 23 लाखाहून अधिकच्या रकमेचा गैर व्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सर्व पैसे चेकद्वारे काढण्यात आले आहे. यामधे भरतसिंग पाटील यांनी 6 लाख रुपये खात्यात वर्ग करुन घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे.