जळगाव : सुरुवातीला चार हजार रुपयांची लाचेची मागणी व तडजोडीअंती तिन हजार रुपये लाचेच्या स्वरुपात स्विकारणा-या वायरमनला एसीबीच्या जळगाव पथकाने ताब्यात घेत कारवाई केली आहे. अनिल शंकर राठोड (वरिष्ठ तंत्रंज्ञ, (वायरमन) धानोरा, रा. लक्ष्मी नगर धानोरा ता चोपडा) असे लाच स्विकारणा-या वायरमनचे नाव असून त्याच्याविरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे देवगांव ता. चोपडा शिवारातील शेतात ट्युबवेल मोटारसाठी कनेक्शन हवे होते. त्याकामी तक्रारदाराने ऑनलाईन अर्ज केला होता. तक्रारदाराने या कामाच्या संदर्भात वायरमन अनिल राठोड यांची भेट घेतली होती. भेटीअंती वायरमन अनिल राठोड याने चार हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तिन हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारताच जळगाव एसीबी पथकाने वायरमनला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्यासह सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव तसेच सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना. किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. राकेश दुसाणे, पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पो कॉ अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.