डोंबिवली : पान टपरीवर नोकर पैसे चोरत असल्याच्या संशयातून मालकाने त्याचा खून करुन मृतदेह तलावात फेकून दिल्याची घटना कल्याण शिळ मार्गावर घडली होती. क्राईम ब्रँचने मारेकरी मालकास अटक केली असुन आज त्याला कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. क्राईम ब्रँचने या किचकट व गंभीर खूनाचा तपास पुर्ण केला. या गुन्ह्यात अजून दोघा जणांचा समावेश असून पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहेत.
सुनील श्रीराजवा पटेल (28) पांडुरंग वझे कम्पाऊंड, ललीत काट्याजवळ, मानपाडा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. कल्याण-शिळ मार्गावरील क्लासिक हॉटेलच्या पान टपरीवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. या वादात एकाची हत्या झाल्याची माहिती क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांना समजली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूपण दायमा, फौजदार नितीन मुदगुन, हवा. दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, विलास मालशेटे, राजेंद्र खिलारे, अरविंद पवार, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, हरिश्चंद्र बंगारा, बाळा पाटील, अजित राजपुत, राहूल ईशी आदींनी तपास पुर्ण केला.
सुनील पटेल याने स्वत: त्याच्या दोघा नोकरांसज सुरीज स्वरुप पाल (18) मुळ रा. ग्राम भदेहदू तह. बबेरु, जि. वादा, उत्तरप्रदेश यास पानटपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या कारणावरुन मारहाण केली होती. त्याचे डोके आपटून ठार केले होते. सुरीज पाल याचा मृतदेह पोत्यात भरुन क्लासिक हॉटेलच्या मागे असलेल्या दलदलीच्या तलावात फेकून दिला होता. मानपाडा पोलिस पुढील तपास करत आहेत.