जळगाव, दि. २९ प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (ता. २९) ला चौथी फेरी खेळवण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळ करत स्पर्धेत आपली छाप उमटवली. मुलांच्या गटात आज अनेक चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या, तामिळनाडूच्या जैदंबरीश ने २००० मानांकन असलेल्या तेलंगणाच्या विघ्नेशला ७२ चालीपर्यंत झुंज दिली. तर आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरला तो महाराष्ट्र संघातील रायगडचा पारस भोईर, दुसऱ्या पटावर खेळल्या गेलेल्या डावात सेमीस्लाव पद्धतीचा बचाव निवडत महाराष्ट्राच्या पारसने तेलंगणाच्या कँडीडेट मास्टर शैक सुमेरला सुरवातीपासूनच गोंधळात टाकले. पारसची २२ वी उंटाची चाल व २३ व्या चालीतील घोड्याचे बलिदानाने पांढऱ्या सैन्याची संपूर्ण दाणादाण उडाली. ४३ व्या चलीपर्यंत आपला वरचष्मा राखत पारसने या मोक्याच्या क्षणी संधीचे सोने केले आणि स्पर्धेत सर्वांना आश्चर्याचा धक्का देत खळबळजनक निकालाची नोंद केली. तसेच पहिल्या पटावर डावाच्या सुरवातीलाच घोड्याची फ-४ सारखी मार्मिक चाल न सापडल्याने मयंकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण डावाच्या अंतिम भागात काळ्या उंटाची ब-८ जागेवर चालीमुळे पांढऱ्याच्या दोन्ही प्याद्याना रोखण्यात मयंक यशस्वी ठरला व डाव अनिर्णीत राहिला. सातव्या पटावर तेलंगणच्या पवनने जी पट्टीतील प्यादे पुढे ढकलत विवानच्या हल्ल्याला परतवून लावले व डावाचा निकाल अनपेक्षितपणे आपल्या बाजूस फिरवला. दिवसअखेर अंतिम वृत्त हाती आले तेव्हा मुलांच्या गटात इम्रान, अर्शप्रीत सिंह व पारस भोईर यांनी ४ गुणांसह आघाडी घेतली असून ९ खेळाडू साडे तीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय क्रमांकावर आहेत.
मुलींच्या गटातही महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून धक्कादायक निकाल – चौथ्या फेरीत मुलींच्या गटात आठव्या क्रमांकावरील पटावर त्रिपुराच्या आर्शिया दासने संहिता पूनगावनमचा अवघ्या २२ चालितच धुव्वा उडवला. तर सुरवी भट्टाचार्य व मोदीपल्ली दीपशिखा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलींच्या गटात देखील धक्कादायक निकालांची परंपरा चालू ठेवली आहे. पहिल्या पटावरील संनिध्दी भटने काळ्या सोंगट्यांनिशी खेळताना स्कँडनिवियन बचाव पद्धती निवडत, पांढऱ्या राजावर घणाघाती हल्ला चढवला, मृत्तिका चा राजा पटाच्या मध्यभागी जखडून राहिल्याने तिला पराभवाच्या नामुष्की ला सामोरे जावे लागले. अंतिम वृत्त हाती आले तेव्हा चौथ्या फेरिअखेर संनिध्दी भट आणि आंध्रा ची आमुक्ता गुंटाका ४ गुणांसह आघाडीवर असून शूभी गुप्ता, अनुपमा श्रीकुमार, जागृती कुमारी, सपर्या घोष व शेराली पट्टनाईक साडे तीन गुणांसह द्वितीय स्थानांवर आहेत.
निसर्गरम्य वातावरण पालकांना भावले…बुद्धिबळ स्पर्धेतील स्पर्धकांना व पालकांना अनुभूती निवासी स्कूलचे निसर्गरम्य वातावरण भावलेले दिसून आले. याबाबत काही पालकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. अनुभूती निवासी स्कूलचा परिसर मोहित करून टाकणारा आहे. जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीचे आयोजन, त्यांनी पुरवलेल्या सुविधा व निसर्गरम्य वातावरण आम्हा पालकांसह मुलांसाठीही आरोग्यदायी आहे. मनाला शांती मिळण्यास व आजूबाजूच्या हिरवळीने सर्व थकवा निघण्यास विशेष मदत होते असे बंगळुरू चे कृष्णप्रसाद यांनी सांगितले.