जळगाव, दि ५ (प्रतिनिधी):- अनुभूती स्कूलमध्ये ३ दिवसीय कॉमर्स कार्निव्हल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची सांगता आज झाली. या वेळी अनुभूती स्कूलचे प्राचार्य श्री देबासिस दास यांनी जपानमधील वाणिज्य क्षेत्रातील संधींपेक्षा भारतात त्याच क्षेत्रात अनेक संधी आहेत आणि त्यामुळे या क्षेत्राला उज्जवल भवितव्य आहे असे ते उदघाटन समारंभात म्हणाले. पहिल्या दिवशी समारोपाला विद्यार्थ्यांनी अन्नातील भेसळ आणि त्याची जाणीव ह्या विषयावर पथनाट्याचा प्रयोग करुन दाखवला.
या कॉमर्स कार्निव्हलच्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीला ११वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी भारताच्या अर्थ व्यवस्थेवर निवडणूकांचा होणारा आर्थिक परिणाम ह्या विषयावर एक सादरीकरण केले. त्यानंतर जळगावातील उद्योजक डॉ. युवराज परदेशी यांच्या अध्यक्षीय समितीसमोर काही विद्यार्थ्यांनी अनुभूती-निओ (न्यू एंटरर्प्रिन्यूरिअल ऑपॉर्च्युनिटी-एनईओ निओ) या एनरिचमेंट प्रोग्रॅममध्ये नवीन प्रकारच्या व्यवसायाच्या नवीन उत्पादनांचे व कल्पनांचे सादरीकरण केले. ह्या समितीने एकूण अंतिम १५ उत्पादनांची निवड करण्यात आली. एवढ्या कमी वयात विद्यार्थ्यांची उद्योजकते विषयी असलेली समज आणि समाजासाठी काहीतरी नवीन करण्याची भावना खरंच भरवणारी आहे असं मत डॉ. युवराज परदेशी यांनी व्यक्त केले.
तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांची सुरुवात ट्रेझर हंट ने झाली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरातच दिलेल्या क्लृप्त्यांच्या साह्याने संपत्तीचा शोध घ्यायचा होता. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी विद्यार्थ्यांनी फनफेअर अंतर्गत विविध खेळ खेळले व त्याचा आनंद लुटला. तिसऱ्या दिवसअखेर अल्फ्रेस्को डिनर (उघड्यावर केलेले रात्रीचे जेवण) ने तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची व संपूर्ण कार्निव्हलची सांगता झाली. या तिन्ही दिवशी सगळ्या कार्यक्रमांची आखणी ९वी व ११वी कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.
ह्या तीन दिवसांच्या समारंभाचे औपचारिक उद्घाटन जैन फार्म फ्रेश लि. चे संचालक अथांग जैन यांच्या हस्ते २९ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी भारतात तरुण उद्योजकांना भरपूर संधी उपलब्ध आहेत पण त्यांना ह्या संधीपासून फायदा घेण्यासाठी अनेक समस्या व अडचणी येतात असे श्री अथांग जैन यांनी प्रतिपादन केले. तरुण उद्योजकांनी ह्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी भरपूर परिश्रम केले पाहिजे. अनुभूती स्कूलच्या वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी या वेळी जायका-इ-अनुभूती हा कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांनी विविध प्रकारचे अन्नपदार्थ आगीचा वापर न करता तयार केले. हा त्यांच्या स्वयंपाकातील कौशल्याचा उत्तम नमुना त्यांनी सादर केला. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीततेसाठी कॉमर्स वरिष्ठ शिक्षक अशोक महाजन, स्वागत रथ व प्रदीप्तो चॅटर्जी यांनी परिश्रम घेतले.