मनस्थिती बिघडलेला धर्मेंद्र भुसावळला आला — चोर समजून जमावाच्या मारहाणीत ठार झाला

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : आपण सर्वजण या भुतलावरील पाहुणे कलाकार आहोत. कळसुत्री बाहुल्यांप्रमाणे आपण नियतीच्या तालावर आपले कार्य पार पाडत असतो. या भुतलावर कुणाला काय भुमिका द्यायची आणि किती कालावधीसाठी द्यायची हे नियती ठरवत असते. ज्याचे मरण ज्या ठिकाणी, ज्या वेळी विधीलिखीत असेल त्याठिकाणी त्या निश्चित वेळेवर मनुष्य स्वत:हून जात असतो. कुणाच्या हातून कोणता विधी करायचा हे देखील विधीच्या अर्थात  नियतीच्या मनात आणि गर्भात दडलेले असते. कुणाच्या हातून कुणाची आणि कधी हत्या घडणार, कुणाचा अपघात होणार हे विधीलिखीत असले तरी संबंधीत मनुष्य हा एक निमीत्तमात्र आणि माध्यम असतो. हत्या करणारा, हत्येचा तपास करणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच त्या गुन्ह्याची बातमी देणारे पत्रकार, गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज करणारे न्यायधीश, वकील हे सर्व गुन्ह्याच्या अनुशंगाने काम करणारे विधीलिखीत माध्यम असतात. या माध्यमांच्या सर्व कड्या आपोआप जुळून येत असतात.

  

उत्तर प्रदेशच्या झाशी येथील रहिवासी असलेला धर्मेंद्र महिपत राजपूत (लोधी) हा जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होता. गेल्या काही महिन्यांपासून का कुणास ठाऊक धर्मेंद्रची मानसिक अवस्था बिघडली होती. तो कधी कधी वेड्यासारखा वागत आणि बोलत होता. पत्नी आणि मुलांचा धनी असलेला बेरोजगार धर्मेंद्र गेल्या काही महिन्यांपासून वेडसर झाल्याप्रमाणे स्वत:सोबतच बोलत होता.

Dharmendra rajput

उत्तर प्रदेशच्या सिमेवर मध्य प्रदेशात धर्मेंद्रचा शालक जगभान रोशनलाल लोधी रहात होता. मिळेल त्या ठिकाणी तो मजुरीसाठी जात होता. हैद्राबाद येथील एका साईटवर तो मजुरीसाठी गेला होता. त्याच्या मुळ गावापासून जवळच असलेल्या गावी त्याचा मित्र आनंद रामकुमार झा हा रहात होता. आनंद झा हा सध्या छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्याच्या कामावर गिट्टी मशीन चालक म्हणून काम करत होता. जगभान आणि आनंद हे दोघे एकमेकांचे मित्र होते. दोघे एकमेकांसोबत फोनवर बोलत असत. त्यामुळे जगभान याने आनंदला फोन करुन जेसीबी चालक असलेल्या धर्मेंद्रसाठी काही काम मिळेल का? अशी विचारणा केली. त्यावर आमच्या साईटवर जेसीबी चालकाची गरज असल्याचे आनंद याने जगभान यास सांगितले. ठेकेदारास विचारुन धर्मेंद्र यास जेसीबी चालकाचे काम मिळवून देण्याची जगभान याने आनंदला विनंती केली. आनंद याने त्याच्या ठेकेदार मालकासोबत बोलून धर्मेंद्र यास झाशी येथून छत्रपती संभाजीनगर येथील साईटवर जेसीबी चालवण्यासाठी बोलावून घेतले.

ठरल्यानुसार 19 डिसेंबर 2023 रोजी धर्मेंद्र राजपूत हा झाशी येथून सचखंड एक्सप्रेसने औरंगाबाद येथे प्रवासाला निघाला. 20 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता तो साईटवर आला. आनंद झा याने त्याची ओळख ठेकेदारासोबत करुन दिली. सातशे रुपये रोजंदरीप्रमाणे तो कामावर हजर झाला. मात्र काम सुरु करताच त्याची मानसिकता बिघडली. तो स्वत:शीच काहीतरी बडबड करु लागला. त्याला व्यवस्थित जेसीबी चालवता येत नव्हते. जेमतेम अर्धा दिवस त्याने कसेबसे काम केले. त्याला जेसीबी मशिन व्यवस्थित चालवता येत नसल्यामुळे ठेकेदारास त्याचे काम काही आवडले नाही.

ठेकेदाराने त्याला कामावर ठेवण्यास नकार दिला. धर्मेंद्र याने देखील याठिकाणी माझे कामात मन लागत नाही असे म्हणत मला घरी जायचे अशी बडबड सुरु केली. तो सारखा सारखा फोनवर कुणाशीतरी बोलत होता. एकंदरीत त्याची मानसिक अवस्था ब-याच प्रमाणात बिघडली होती. त्याने घरी जाण्याचा पाढा सुरु केल्यामुळे ठेकेदाराने त्याला त्या दिवसाचा त्याचा रोज सातशे आणि खर्चाला दोनशे असे एकुण नऊशे रुपये दिले आणी त्याची कामातून मुक्तता केली.

रात्रभर आनंद झा याच्या खोलीवर मुक्कामी थांबल्यानंतर तो 22 डिसेंबर रोजी पुन्हा झांशी येथे जाण्यास निघाला. आनंद याने त्याला मोटार सायकलने वाटेत पेंडापूर फाट्याजवळ सोडले. तेथून दोघे आपापल्या वाटेने निघून गेले. धर्मेंद्र हा झांशी येथे जाण्यासाठी निघाला असल्याची माहिती आनंद याने त्याचा मित्र जगभान याला फोनवर  दिली.  त्यानंतर तिन दिवस उलटले तरी देखील धर्मेंद्र घरी पोहोचला नाही. त्यामुळे जगभान याने आनंदला फोन करुन विचारणा केली. त्यावर आनंदने त्याला सांगितले की तो 22 डिसेंबर रोजीच येथून निघाला आहे. मी त्याला ठेकेदाराकडून नऊशे रुपये घेऊन दिले आणि वाटेत पेंडापूर फाट्यावर त्याला सोडले होते. तेथून तो संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर गेला होता.

इकडे झाशी येथे परत येण्यास निघालेल्या धर्मेद्रसोबत जगभान याने संपर्क साधला. रेल्वे प्रवासात असलेल्या धर्मेंद्र याने जगभान सोबत बोलतांना विचीत्र बोलण्यास सुरुवात केली. मी घरी येत नाही, मी रेल्वेतून उडी मारुन घेतो असे म्हणत त्याने फोनवर बडबड सुरु केली. धर्मेंद्र हा भुसावळ दरम्यान असतांना पलीकडून जगभान याने त्याला विचारले की तु नेमका कुठे आहेस? त्यावर त्याने मी चाळीसगाव येथे आहे असे उत्तर दिले आणि तो भुसावळ येथे रेल्वेतून उतरुन  गेला.   

दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी तो भुसावळ रेल्वे स्टेशनवर उतरला. भटकंती करत करत रात्रीच्या वेळी तो जामनेर रस्त्यावरील डिगंबर सरोदे यांच्या मालकीच्या हॉटेलजवळ आला. त्यावेळी रात्रीचे साधारण साडे अकरा वाजले होते. हॉटेलमधे त्यावेळी तिन ग्राहक बसलेले होते. भटकत भटकत हॉटेलच्या काऊंटरजवळ धर्मेंद्र आला. हॉटेल मालक डिगंबर सरोदे यांना त्याने हिंदीतून “पाणी कहा है?” अशी विचारणा केली. त्यावर सरोदे यांनी त्याला “सामने जार रखा है” असे सांगितले. जार ठेवलेल्या जागेवर जावून धर्मेंद्रने पाणी घेतले. त्यानंतर तो पुन्हा हॉटेलच्या काऊंटर जवळ आला आणि “वाश बेसिन कहा है हाथ धोना है” असे विचारु लागला. त्यावर सरोदे यांनी त्याला हाताने इशारा करुन बेसीन दाखवले. हात धुतल्यानंतर तो हॉटेलच्या कंपाऊंडच्या दिशेने स्वत:शीच बडबड करत चालू लागला.

तो कुणाला तरी शोधत असल्याचा अंदाज लावत त्याचा वेडसरपणा बघून हॉटेल मालक डिगंबर सरोदे यांनी त्याला बोलावून विचारले की “तु किसके साथ आया है?” त्यावर तो उत्तरला की “मै चाचा के साथ आया हू, चाचा अंदर बैठे है”.  त्यामुळे हॉटेल मालक सरोदे यांनी त्याला आत बसलेल्या ग्राहकांकडे नेऊन हा तुमच्यासोबत आहे का? असे विचारले. त्यावर हा आमच्यासोबत नाही असे हॉटेलमधील ग्राहकांनी उत्तर दिले. त्यामुळे हॉटेल मालक डिगंबर सरोदे यांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी त्याला हॉटेलमधून बाहेर हाकलून दिले. धर्मेंद्र हॉटेलच्या बाहेर उभा होता त्यावेळी रात्रीचे साधारण बारा वाजून गेले होते. हॉटेलच्या बाजूला असलेल्या ट्रॅव्हल्स स्टॅंडकडे तो पायी पायी गेला.

तेथून काही वेळाने तो पुन्हा हॉटेलजवळ आला आणि तेथेच थांबला. तो परत आल्याचे बघून हॉटेल मालक डिगंबर सरोदे यांच्या वडीलांनी त्याला हाकलून दिले. हॉटेल बंद केल्यानंतर सर्वजण जेवण करण्यास बसले. सरोदे पिता पुत्र आणि हॉटेलचे कर्मचारी असे सर्वजण जेवण करत असतांना त्यांना जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. नेमका काय प्रकार आहे हे बघण्यासाठी डिगंबर सरोदे आणि त्यांचा वेटर कौस्तुभ दामले असे दोघे जण आवाजाच्या दिशेने पळाले. तेथे जावून पाहिले असता त्याठिकाणी पाच ते सहा जण उभे होते. त्यापैकी मनोज बुटासिंग चितोडीया आणि जमेरीसिंग चितोडीया या दोघांच्या हातात काठी होती. दोघे जण वेडसर धर्मेंद्र यास त्यांच्या हातातील काठीने अमानुषपणे बेदम मारहाण करत होते. त्यांच्या बेदम मारहाणीमुळे जखमी धर्मेद्र जोरजोरात कन्हत होता. तेथे हजर असलेला पप्पू चितोडीया हा देखील त्याच्याकडील बॅटने धर्मेंद्र यास बेदम मारहाण करत होता. या तिघांसोबत असलेले इतर दोघे अनोळखी इसम देखील हातातील लाठा काठ्यांनी धर्मेद्र यास बेदम मारहाण करत होते.

वेडसर हालचाली करणा-या धर्मेंद्र यास सर्वजण का मारहाण करत आहेत याची उपस्थितांनी माहिती घेतली असता समजले की तो जमेरीसिंग चितोडीया याच्या सुमो या वाहनाचा दरवाजा उघडत होता. त्याला चोर समजून सर्वांनी बेदम मारहाण केली. मरणासन्न अवस्थेतील धर्मेंद्र यास हॉटेलच्या पलीकडे सोडून दे असे मनोज चितोडीया याने हॉटेल मालक डिगंबर सरोदे यास म्हटले. त्यामुळे डिगंबर सरोदे यांनी जखमी धर्मेद्र राजपूत(लोधी) यास हॉटेलच्या पलीकडे गजानन महाराज मंदीराकडे नेवून सोडून दिले. त्यानंतर डिगंबर सरोदे पुन्हा आपल्या हॉटेलमधे जेवण करण्यासाठी व तेथून आपल्या घरी निघून गेले. हा प्रकार झाल्यानंतर जखमी व मरणासन्न अवस्थेतील धर्मेंद्र भुसावळ तालुका पोलिस स्टेशननजीक वांजोळा शिवारात धडपड करत चालत चालत गेला. त्याठिकाणी रस्त्याचे काम सुरु होते. त्या कामावरील टॅंकर चालकाने त्याला पिण्यास पाणी दिले. पाणी पिऊन जखमी धर्मेद्र हा एका झाडाखाली झोपला तो कायमचाच. तो रस्त्याचे काम करणारा कामगार असावा असे समजून त्याच्याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही.   

या घटनेनंतर 23 डिसेंबरचा दिवस उजाडला. या दिवशी दुपारी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला पोलिस पाटील बांधवांची मासिक बैठक होती. या बैठकीला जाण्यासाठी वांजोळा गावचे पोलिस पाटील संतोष भिका कोळी तयारी करत होते. मासिक बैठकीला येत असतांना वाटेत त्यांना सुरेश रामदास पाटील हा वांजोळा गावचा शेतकरी भेटला. त्याने पोलिस पाटील संतोष कोळी यांना थांबवून माहिती दिली की वांजोळा शिवारातील वांजोळा – मिरगव्हाण रस्त्यालगत असलेल्या सोनाली जैन यांच्या शेतात एक अज्ञात तरुण दुपारपासून झोपलेला आहे. आम्ही त्याला उठवण्याचा खुप प्रयत्न केला मात्र तो उठत नाही. कदाचीत तो मरण पावला असावा अशी माहिती संतोष कोळी यांना त्या शेतक-याकडून समजली.  या घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील संतोष कोळी यांनी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनाला माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बबन जगताप यांनी पुढील कारवाईची सुत्रे हलवली. मरण पावलेला धर्मेंद्र लोधी हा पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता. पोलिसांसाठी अनोळखी असलेल्या मयत धर्मेंद्रला ट्रामा केअर सेंटरमधे दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेप्रकरणी सुरुवातीला भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पोलिस पाटील संतोष कोळी यांच्या खबरीवरुन सीआरपीसी 174 नुसार 43/23 या क्रमांकाने ही नोंद घेण्यात आली. या अकस्मात मृत्यूचा पुढील तपास स.पो.नि. अमोल पवार यांच्याकडे देण्यात आला. या अकस्मात मृत्यूबाबतची तपास यादी सर्व पोलिस स्टेशनला वितरीत करण्यात आली. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्याकामी तो दवाखान्यात ठेवण्यात आला.

या घटनेपुर्वी मयत धर्मेद्रचे त्याचा मध्य प्रदेशात राहणारा शालक जगभान रोशनलाल लोधी याच्यासोबत मोबाईलवर बोलणे झाले होते. रेल्वे प्रवासात भुसावळनजीक असतांना मयत धर्मेंद्र याने तो चाळीसगाव येथे असल्याचे जगभान यास सांगितले होते. मी रेल्वेतून उडी मारतो असे देखील त्याने जगभान यास मोबाईलवर बोलतांना मरणापुर्वी म्हटले होते. त्यामुळे भुसावळ येथे मयत झालेल्या धर्मेंद्रचा जगभान याने चाळीसगाव येथे शोध घेतला. मात्र तो चाळीसगाव येथे मिळून आला नाही.

या कालावधीत मयताची ओळख पटवण्याकामी भुसावळ तालुका पोलिसांची तपासयादी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला वितरीत झाली होती. त्या अनुशंगाने त्याला चाळीसगाव पोलिसांनी भुसावळ येथे जावून तपास करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मयत धर्मेंद्र याचा शोध घेत घेत त्याचा नातेवाईक जगभान लोधी हा भुसावळ तालुका पोलिसांच्या संपर्कात आला. त्याला धर्मेंद्र लोधी याचा मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला. पोलिसांच्या दृष्टीने आतापर्यंत अज्ञात असलेल्या मृतदेहाची ओळख पटली. मयताची ओळख पटल्याने पोलिस तपासाचा बराचसा ताण कमी झाला. जगभान याचा जवाब घेतल्यानंतर कायदेशीर पुर्ततेनंतर धर्मेंद्रचा मृतदेह त्याच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यविधीसाठी धर्मेंद्रचा मृतदेह झाशी येथे नेण्यात आला.  

दरम्यानच्या कालावधीत मयत धर्मेंद्रचा मृत्यू डोक्यावर आणि अंगावरील जबर मारहाणीमुळे झाल्याचा वैद्यकीय अहवाल भुसावळ तालुका पोलिसांना मिळाला होता. गुप्त बातमीदार आणि तांत्रीक मदत घेत 22 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे घटनास्थळ पोलिसांनी शोधून काढले. ज्या हॉटेलजवळ मयतास मारहाण झाली होती तो हॉटेल मालक डिगंबर सरोदे यास शोधून काढण्यात आले. त्याला मयत धर्मेंद्र राजपूत (लोधी) याचा फोटो दाखवून घटनेच्या दिवशी झालेल्या घटनाक्रमासह मयताची ओळख पटवण्यात आली. हॉटेल मालक डिगंबर सरोदे यास शोधून काढल्यानंतर क्रमाक्रमाने हॉटेलमधील वेटर आणि इतर संबंधीत सर्वांचे जवाब घेण्यात आले. त्या सर्वांच्या जवाबानुसार या घटनेच्या सर्व कड्या जुळवण्यात आल्या.

या घटनेप्रकरणी स.पो.नि. अमोल पवार यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत जमेरीसिंग चितोडीया, पप्पूसिंग चितोडीया व इतर दोन अनोळखी लोकांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील जमेरीसिंग चितोडीया आणि पप्पूसिंग चितोडीया या दोघांना अटक करण्यात आली. इतर दोघे संशयीत आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अटकेतील दोघांची ओळख परेडची प्रक्रिया सुरु होती. 

भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अमोल पवार,हे.कॉ. संजय तायडे, हे.कॉ. संजय भोई, हे.कॉ. दिपक जाधव, वाल्मिक सोनवणे, प्रेम सपकाळे आदी करत आहेत. पोलिस हे जनतेचे सेवक आहेत. त्यांना सहकार्य करणे जनतेचे काम आहे. चोर समजून जमेरीसिंग चितोडीया व पप्पूसिंग चितोडीया या दोघांनी धर्मेंद्र लोधी यास मारहाण करण्याऐवजी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले असते तर ही अप्रिय घटना टळली असती. याशिवाय घटना घडली त्याचवेळी हॉटेलमालकाने पोलिसांना माहिती दिली असती तरी देखील पुढील अप्रिय घटनाक्रम टाळता आला असता. मात्र कुणीही पुढाकार घेत भुसावळ तालुका पोलिसांना माहिती दिली नाही. घटना घडून गेल्यानंतर देखील या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत न पोहोचल्याने या प्रकरणातील गुंता वाढत गेला. तरी देखील पोलिस आणि मयत धर्मेंद लोधी याचा नातेवाईक जगभान लोधी यांच्या सहकार्याने या गुन्ह्याचा तपास लागला. पोलिसांची तपासयादी, खबरी आणि तांत्रीक मदत  या तपासात महत्वाची ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here