अहमदनगर : पाच लाखांच्या खंडणीसाठी वकील दाम्पत्याचे अगोदर अपहरण व त्यानंतर दोघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील उंबरे येथे 25 जानेवारी रोजी ही धक्कादायक घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांच्यासह त्यांच्या पथकाने तपासाची सुत्रे फिरवत अवघ्या चोवीस तासांच्या आत मुख्य आरोपीसह त्याच्या तिघा साथीदारांना ताब्यात घेत अटक केली आहे.
पाच लाखांची खंडणी न दिल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. राजाराम जयवंत आढाव (52) व मनीषा राजाराम आढाव (42) दोघे रा. मानोरी, ता. राहुरी हे वकील दाम्पत्य 25 जानेवारीला त्यांच्या राहत्या घरातून राहुरी न्यायालयात कामकाजासाठी गेले. दुपारनंतर नातेवाईकांनी त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो झाला नाही. या प्रकरणी त्यांच्या नातेवाईक लता राजेश शिंदे (संगमनेर) यांनी राहुरी पोलिस स्टेशनला त्यांच्या बेपत्ता झाल्याप्रकरणी मिसींग दाखल करण्यात आली.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासकामी सुचना दिल्या. पो.नि. दिनेश आहेर यांनी आपले सहकारी पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भीमराज खर्से, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे आदींची तीन पथके तयार करुन शोध सुरु केला.
पोलिस तपास पथकाने मानोरी ते राहुरी मार्गासह राहुरी न्यायालयात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच वकील दाम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकीलपत्र आहे याची माहिती घेतली. त्याचवेळी राहुरी न्यायालय परिसर तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा व रात्रीच्या वेळी गेली असल्याचे पोलिसांना आढळून आले. या संशयीत कारचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशिंग (रा. राहुरी) याचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दाम्पत्याकडे असल्याचे व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेली संशयित कार किरण दुशिंग वापरत असल्याची माहिती पुढे आली.
संशयाच्या आधारे पोलिसांनी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (32) रा. उंबरे, ता. राहुरी यास चौकशीकामी ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती त्याने खंडणीसाठी आपल्या साथीदारांसह हा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या तिघा साथीदारांना अटक केली. वकील दाम्पत्यांचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकण्यात आले. त्यानंतर वकील दाम्पत्याची गाडी राहुरी न्यायालय परिसरामध्ये लावण्यात आली. आरोपीने कथन हकीकतीनुसार खात्री केली असता उंबरे गावानजीकच्या विहिरीमध्ये वकील दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. वकील दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ मानोरी ग्रामस्थांच्या वतीने शोकसभा ठेवण्यात आली होती. संपूर्ण गाव शनिवार दि. 27 रोजी बंद ठेवण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत वकील दाम्पत्याचा अंत्यविधी मानोरी येथे करण्यात आला.
मुख्य आरोपी किरण दुशिंग व त्याचे साथीदार भय्या ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी), शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी), बबन सुनील मोरे (रा. उंबरे, ता. राहुरी) यांनी कट रचून वकील दाम्पत्याला न्यायालयीन कामकाजाच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना किरण दुशिंग याने स्वतःच्या गाडीत बसवून वकील दाम्पत्याच्या घरी नेले. घरामध्ये दोघांचे हात-पाय बांधून पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. वकील दाम्पत्याने त्यांना खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये जवळपास पाच ते सहा त्यांचा छळ करण्यात आला. त्यानंतर त्यांना त्यांच्याच गाडीमध्ये बसवून मानोरी गावच्या बाहेर नेण्यात आले. रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरुन त्यांचा खून करण्यात आला.
याप्रकरणी राहुरी पोलिस स्टेशनला भादंवि 302, 363, 201 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किरण दुशिंग याच्यासह साथीदार भय्या ऊर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजीत महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश आले. किरण दुशिंग हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध संगमनेर, राहुरी, नाशिक अशा विविध पोलिस स्टेशनच्या दप्तरी खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा एकूण बारा गुन्ह्यांची नोंद आहे.