भिवंडी : वाहन घेण्यासाठी पत्नीच्या माध्यमातून तिच्या माहेरुन पैशांची मागणी पुर्ण झाली नाही. त्यामुळे तिला मोबाईलवरुन तिहेरी तलाक देणा-या पतीला पोलिसांच्या लॉकअप मधे जाण्याची वेळ आली. शांतीनगर पोलीस स्टेशनला तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पीडित पत्नीने गुन्हा दाखल केला. सुभान आजम खान ( रा. समरुबाग) असे आरोपी पतीचे नाव असून त्याला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
आझादनगर येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेचा चार वर्षांपूर्वी आरोपी सुभान खान याच्यासोबत मुस्लिम धार्मिक पद्धतीने निकाह झाला होता.लग्नानंतर तो तिला विविध कारणावरुन त्रास देवू लागला. तलाक देण्यापुर्वी आरोपी सुभानने मोटरसायकल विकत घेण्यासाठी तिला माहेरवरून पैसे घेऊन ये असा तगादा लावला होता. तसेच 24 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या सुमाराला तिच्या मोबाईलवर त्याने संपर्क साधला.
मोबाईलवर शिवीगाळ करत तिला तिहेरी तलाक देत तलाक झाल्याचे त्याने तिला म्हटले. पीडित पत्नीने याप्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. शांतीनगर पोलीस स्टेशनला भा.दं.वि. 498 अ, 323, 504 नुसार मुस्लिम महिला विवाह हक्क सरंक्षण कायदा कलम 4 नुसार तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार आर.आर. चौधरी करत आहेत.