यावल : यावल तालुक्यातील डांभुर्णी ते डोणगाव दरम्यान रस्त्यावर पोलिसांच्या पथकाने एका वाहनाचा सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग केला. या पाठलागात सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या सागवानी लाकडाच्या पाट्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेतील वाहनचालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. तालुक्यातील किनगाव परिसरातून दररोज सागवानी लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु असल्याचे या निमित्ताने बोलले जात आहे. या घटनेतून यावल वन विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस येत आहे.
सागवानी लाकडाचा माल पकडण्यात आला त्या जागेपासून सुमारे 5 ते 7 कि.मी.अंतरावर तापी नदी पुलाच्या जवळ वन विभागाचा तपासणी नाका आहे. तेथून हा माल नियोजन करुन पसार झाला असल्याचे खुलेआम बोलले जात आहे.
यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या सहकारी कर्मचार्यांसह किनगाव परिसरात दुपारी गस्त घालत होते. गस्ती दरम्यान साडे अकरा वाजेच्या सुमारास डांभुर्णी डोणगाव रस्त्यावर एमएच 05 आर 3719 हे टाटा कंपनीचे चार चाकी वाहन सुसाट वेगाने धावत असल्याचे निदर्शनास आले. पो.नि. अरुण धनवडे यांना या वाहनाचा संशय आला. त्यांनी या वाहनाचा चलाखीने पाठलाग सुरु केला. आपला पाठलाग सुरु असल्याचे बघून संशयित वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या एका ठिकाणी उभे केले व तो पसार झाला. पोलीसांनी या संशयीत वाहनाची झडती घेतली. त्या चारचाकी वाहनात अतिशय महाग नव्या को-या सागवानी लाकडाच्या 20 पाट्या होत्या. या सागवानी लाकडाची किंमत बाजारभावानुसार अंदाजे पाच लाख तर सरकारी भावानुसार अंदाजे अडीच लाख रुपये असल्याचे समजते.
पो.नि. अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेबुब तडवी, निलेश वाघ, जगन्नाथ पाटील, चालक भैय्या पाटील, मदतनीस युवराज घारू यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत ही कारवाई पुर्ण केली. वन विभाग पश्चिम विभागाचे वन क्षेत्रपाल विशाल कुटे, वाहन चालक भरत बाविस्कर, अशोक मराठे, वनपाल असलम खान यांच्या समक्ष या जप्त लाकडाचा पंचनामा करण्यात आला.
दरम्यान अशा रितीने सागवानी लाकडाची तस्करी लपून छपून अथवा खुलेआम होत असल्याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. आज पर्यंत किती लाकडाची तस्करी झाली असावी असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.दरम्यान तालुक्यातील एका संशयीतावर पोलिसांची वक्रदृष्टी असून हा माल त्याचाच असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. सदर संशयीताची प्रवासी वाहने यावल वन विभागात जप्त असल्याचे देखील बोलले जात आहे. हा सागवानी लाकडाचा माल असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. संशयाची सुई असलेला तो अट्टल गुन्हेगार असल्याचे म्हटले जात आहे.