जळगाव : केंद्रशासनाकडून मंजूर निधीच्या पन्नास टक्के अर्थात एक लाखाची रक्कम ग्रामसेवकाच्या सांगण्यावरुन लाचेच्या स्वरुपात ऑपरेटरने स्विकारल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एसीबीने केलेल्या कारवाईच्या जाळ्यात ऑपरेटर सापडला असून ग्रामसेवकाचा शोध सुरु आहे. सुधाकर धुडकू कोळी असे एक लाख रुपयांची लाच स्विकारणा-या यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीच्या ऑपरेटरचे नाव आहे. हेमंत कमलाकर जोशी असे ग्रामसेवकाचे नाव असून त्याचा शोध सुरु आहे.
या घटनेतील तक्रारदाराच्या वडीलांची यावल तालुक्यातील चुंचाळे या गावी संस्था आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीच्या माध्यमातून चुंचाळे या गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करण्याच्या योजनेतून केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या योजनेतून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या मंजूर निधीच्या रकमेतून पन्नास टक्के रक्कम बक्षीस म्हणून ग्रामसेवकाकरवी ऑपरेटरच्या माध्यमातून तक्रारदारास करण्यात आली होती.
तक्रारदारास बक्षिसरुपी लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे धाव घेत तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे एसीबीने पंचासमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्या आधारे रितसर सापळा रचण्यात आला. ग्रामसेवक जोशी यांनी सांगितल्याने ऑपरेटरने चुंचाळे ग्रामपंचायतीत एक लाख रुपयाची लाच घेताच एसीबी पथकाने त्यास रंगेहाथ पकडले.
सापळा पर्यवेक्षन अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्यासह सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोना सुनिल वानखेडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांना पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ.सुरेश पाटील, हे.कॉ. रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सुर्यवंशी आदींचे सहकार्य लाभले.