जळगाव : बसमधे चढणा-या प्रवाशाच्या पॅंटच्या खिशातील मोबाईल मोबाईल शिताफीने चोरणा-या गुन्हेगारास जिल्हापेठ पोलिसांनी तेवढ्याच शिताफीने दोन तासात अटक केली आहे. त्याच्या कब्जातून सत्तर हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. फैजल उर्फ मोगॅंबो ईब्राहीम तांबोळी (रा. हीरापुर झांझर मंदीराच्या मागे, गल्ली नं. 1 मालेगाव जि.नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.
17 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पंजाब राज्यातील रहिवासी विशाल विजय चढ्ढा हे धुळे येथे जाण्यासाठी जळगाव बस स्थानकात आले होते. धुळे येथे जाण्यासाठी बसमधे चढत असतांना फैजल उर्फ मोगॅंबो याने त्यांच्या पॅंटच्या खिशातील मोबाईल अॅपल कंपनीचा मोबाईल चोरला होता. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी कामाला लागले होते. दरम्यान एक संशयीत इसम बस स्थानक परिसरात संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती पो.कॉ. मिलींद सोनवणे, रविंद्र साबळे यांना मिळाली. त्यांनी पो.नि. जायसवाल यांना दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. सलीम तडवी पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. अमितकुमार मराठे, चालक प्रमोद पाटील आदींनी त्याचा शोध सुरु केला.
आपल्या मागावर पोलिस असल्याचे समजताच संशयीत फैजल उर्फ मोगॅंबो हा पलायन करु लागला. त्याचा पाठलाग करत त्याला स्वातंत्र्य चौकात पकडण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. तो मालेगाव छावणी पोलीस स्टेशन हद्दीतील कुविख्यात आरोपी असल्याची माहीती चौकशीत पुढे आली.
पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या पथकातील पो.हे.कॉ. सलीम तडवी, पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. अमितकुमार मराठे, पो.कॉ. रविद्र साबळे, पो.हे.कॉ. रविद्र मराठे, चालक प्रमोद पाटील आदींनी या कारवाईकामी सहभाग घेतला. या गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.कॉ. नरेश भिका सोनवणे व पो. कॉ. प्रविण जाधव करत आहेत.