जळगाव : धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यानजीक झालेल्या करोडो रुपयांच्या लुटीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेत वापरण्यात आलेली चार वाहने व हत्यारे जप्त करण्यात आली असून 48 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी आणि दर्शन भगवान सोनवणे (दोघे रा. विदगाव ता. जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. 17 फेब्रुवारी रोजी भर दुपारी धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथे 1 कोटी 60 लाख रुपयांची धाडसी लुट करण्यात आली होती. याप्रकरणी योगीराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धरणगाव पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटकेतील अनिल उर्फ बंडा याने त्याच्या साथीदारांसह फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत तिन, चोपडा शहर पोलिस स्टेशनला एक आणि धरणगाव पोलिस स्टेशनला एक असे एकुण पाच गुन्हे केलेले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास धरणगाव पोलिस करत आहेत.