जळगाव : गावठी बनावटीचे पिस्टल, चॉपर व काडतुसासह पिता पुत्रास चाळीसगावला अटक करण्यात आली आहे. याशिवाय या पिता पुत्रास हत्यारे पुरवणा-या पुण्याच्या कोयता गॅंगचा फरार सदस्य असलेल्या गुन्हेगार तरुणाला देखील अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश उर्फ मायकल व त्याचे वडील दीपक भटू पाटील (रा. श्रीकृष्ण नगर करगांव रोड, चाळीसगांव) असे पिता पुत्राचे आणि निखिल जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी निक्या (रा. लक्ष्मी नगर येरवडा पुणे) असे पुण्याच्या कोयता गॅंगचा सदस्य असलेल्या तरुणाचे नाव आहे.
रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासात असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या तिघांचा तपास चाळीसगाव शहर पोलिसांना लागला आणि कारवाई करण्यात आली. निखील जगन्नाथ शिंदे उर्फ बंडी हा सराईत गुन्हेगार असून तो येरवडा पुणे येथील कोयता गॅंगचा सदस्य आहे. या कोयता गँगच्या सदस्यांनी दिनांक २५/१२/२०२३ रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मीनगर येरवडा पुणे भागात हातात कोयते, तलवारी व दगड घेवुन सुमारे ३० ते ३५ वाहनांच्या काचा फोडुन परिसरात दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. हा गुन्हा घडल्यापासुन निखील शिंदे उर्फ बंडी निक्या हा फरार होता.
अटकेतील तिघांविरुद्ध चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक योगेश माळी व पोलीस कर्मचारी कल्पेश पगार करत आहेत. पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक योगेश माळी, पोना दिपक पाटील, पोकॉ, अमोल भोसले, विनोद खैरनार, योगेश बेलदार, विनोद भोई, नितीश पाटील, निलेश पाटील नंदकिशेर महाजन मनोज चव्हाण, मपोहेकॉ विमल सानप आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.