जळगाव (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध व्यवसायाचा विषय पुन्हा चर्चेत आणि ऐरणीवर आला आहे. फैजपूरचे माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम यांनी फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैध व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला आहे. फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत सुरु असलेले अवैध व्यवसाय बंद करण्याची त्यांची मागणी आहे. हे व्यवसाय बंद झाले नाही तर शेख कुर्बान हे प्रांत कार्यालयसमोर 4 मार्च 2024 च्या सकाळी अकरा वाजेपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत सुरु असलेले अवैध व्यवसाय जसे सट्टा, जुगार बंद होण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत असलेले माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान हे गेल्या विस वर्षापासून फैजपूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी सहायक पोलिस अधिक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांना दिलेल्या निवेदनातील माहितीनुसार फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 32 गावे आहेत. या सर्व गावांमधे दारु, सट्टा बेटिंग, जुगार क्लब अशा स्वरुपाचे अवैध व्यवसाय सर्रासपणे सुरु आहेत. या अवैध व्यावसायिकांवर पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही. शाळा, कॉलेजेस, धार्मिक स्थळे तसेच प्रतिष्ठीत रहिवासी वस्त्यांमधून जाणारे येणारे हे सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी बघतात.
शेख कुर्बान यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटल्यानुसार मध्यप्रदेशातून दिवसाढवळ्या विमल गुटख्याने भरलेली वाहने फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत सर्रासपणे येत आहेत. तसेच रात्री अपरात्री वाळूची अवैध वाहतूक देखील सुरु असल्याचा आरोप शेख कुर्बान यांनी निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. फैजपूर उप विभागीय पोलिस अधिका-यांच्या नावे असलेल्या निवेदनाच्या प्रती त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधिक्षक, फैजपूर उप विभागीय अधिकारी आणि फैजपूर पोलिस स्टेशनला दिल्या आहेत.
गेल्या 27 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीतील न्हावी या गावी सुरेश किराणा या दुकानात सुनिल अशोक मखीजा याच्याकडे विविध गुटख्यांचा 59 हजार 806 रुपये किमतीचा मुद्देमाल वजा साठा सापडला होता. उप विभागीय तथा सहायक पोलिस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या अख्त्यारीत ही कारवाई करण्यात आली होती. त्यावरुन शेख कुर्बान यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे म्हटले जाते.
फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत सट्टा जुगार तेजीत सुरु असल्याबाबत फैजपूरची जनता आता खुल्या आवाजात म्हणू लागली आहे. जर फैजपूरवासी सट्टा जुगाराबाबत खुलेआम बोलत असतांना हा आवाज फैजपूर पोलिसांना ऐकू येत नाही का? अशी देखील चर्चा आता ऐकण्यास मिळत आहे. फैजपूर पोलिस स्टेशनचा चार्ज घेतलेल्या निलेश नानाजी वाघ यांना आता जवळपास आठ महिने सहज झाले आहेत. मात्र तरीदेखील त्यांनी या सट्टा जुगाराकडे कारवाई करण्याचे धाडस का दाखवले नाही असा खुळा प्रश्न फैजपूरची खुळी जनता विचारत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीवर एकप्रकारे प्रश्नचिन्ह देखील उमटत आहेत. त्यांची ही अर्थपुर्ण डोळेझाक असल्याचे देखील म्हटले जात आहे.
फैजपूर परिसरातील तरुण पिढी सट्टा जुगाराच्या नादी लागल्याचे दिसून येत आहे. फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीतील न्हावी या गावी या जुगार अड्याचा मुख्य व्यावसायीक आपली सुत्रे हलवत असल्याचे म्हटले जाते. न्हावी येथील या मुख्य व्यावसायिकाच्या अख्त्यारीत न्हावी सह मारुळ, आमोदा, हिंगोणा अशी जवळपास 28 गावे असल्याचे समजते. बामणोद हे देखील सट्टा पेढीचे एक मोठे केंद्र असल्याचे म्हटले जात आहे.
काही महिन्यापुर्वी फैजपूर शहराच्या मध्यवर्ती भागात इंगळे आडनावाच्या एका व्यक्तीने सट्टा जुगाराचा अड्डा सुरु केला होता. त्याच्या अड्ड्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला बोलावून मॉनेटरी गेनच्या दृष्टीकोनातून चाचपडून पाहिले गेल्याचे म्हटले जाते. त्याच्याकडून कोणताही लाभ होणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला दम भरुन सोडून देण्यात आल्याचे सांगितले जाते. तथापी फैजपूरचे माजी नगरसेवक शेख कुर्बान यांनी बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्याने फैजपूरचे अवैध व्यवसाय पुन्हा चर्चेत आले आहेत.