फुकटची बियर मिळाली, चौघांनी दंगाच केला मध्यस्ती करणारा हॉटेल मालक जिवानिशी गेला

pankaj vadnere

जळगाव : पंकज वडनेरे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे पंकज वडनेरे आज मनोमन खुष होते. पोलिस दलातील कर्मचारी सुनिल वडनेरे यांचे सुपुत्र पंकज यांचा हसतमुख स्वभाव सर्वांना परिचीत आहे. त्यांचा होमगार्ड मित्र दिपक जगताप याने त्यांना लग्नाच्या पार्टीची गळ घातली. दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मित्र दिपकची इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याला सोबत घेवून मांसाहारी भोजन करण्यासाठी पंकज वडनेरे यांनी नियोजन केले. पंकजचे जळगाव शहरातील एस.टी.वर्कशॉप जवळ असलेल्या आसोदा मटण हॉटेलवर नेहमी जाणे येणे होते. पंकज वडनेरे यांची सासरवाडी असलेल्या आसोदा येथील प्रदिप चिरमाडे यांचे ते हॉटेल होते. त्यामुळे हॉटेल मालक प्रदिप चिरमाडे हे पंकजच्या ओळखीचे होते. त्या माध्यमातून दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे परिचीत होते.  

   

Dr.Neelabh-rohan-ASP

आसोदा येथील रहिवासी असलेले प्रदिप ज्ञानदेव चिरमाडे हे गेल्या सहा ते सात वर्षापासून जळगाव शहरातील एस.टी.वर्कशॉप चौकात मांसाहारी जेवणाची हॉटेल चालवत होते. मात्र लॉकडाऊन काळात प्रशासकीय आदेशानुसार त्यांनी पार्सल सेवा सुरु केली होती. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर एका टेबलवर केवळ दोन ग्राहकांना बसवून ते सेवा देत होते. हॉटेलमधे मदतीसाठी त्यांचा मुलगा गिरीष, पुतण्या निखिल, दोन वेटर व चार महिला कर्मचारी अशा सर्वांच्या मदतीने हॉटेलचा डोलारा सुरु होता. 

12 जूनचा दिवस उजाडला. हा दिवसच मुळात प्रदीप चिरमाडे यांच्यासाठी काळाकुट्ट तर पंकज व दिपक यांच्यासाठी काळा दिवस निघाला. आज पंकज वडनेरे व दिपक जगताप यांचे आसोदा हॉटेलवर जेवणाला जाण्याचे नियोजन झाले होते. एकंदरीत नियतीने घडवून आणलेले हे नियोजन एका दुख:द घटनेला आमंत्रण देणारे होते. घडणारी घटना अटळ असते असे म्हटले जाते. होणारी घटना कुणाला सांगून होत नसते हे देखील तितकेच खरे आहे.

vitthal-sase-PI

सकाळी अकरा वाजता प्रदिप चिरमाडे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने हॉटेल उघडले व सर्वजण कामाला लागले. या हॉटेलच्या बाजुला उमेश बियर शॉपी नावाचे दुकान आहे. या बियर शॉपीचा मालक उमाकांत कोल्हे आहे. हॉटेलच्या ओट्यावरुन या बियर शॉपीचे दर्शन सहजासहजी होते.

याच परिसरातील चौकात एस.टी.वर्कशॉपजवळ महेंद्र महाजन या तरुणाची चहाची टपरी आहे. चहा विक्रेता महेंद्र महाजन आणि त्याचा मित्र प्रशांत कोळी हे दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्थात हिस्ट्रीसिटर आहेत. प्रशांत कोळी याच्यावर शनीपेठ व एमआयडीसी पोलिसात विविध गुन्हे दाखल आहेत. महेंद्र महाजन व त्याचा प्रशांत कोळी या दोघांवर एमआयडीसी पोलिसात सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. या दोघांनी मिळून एका वाहतूक पोलिस कर्मचा-यास एमआयडीसी चौकात मारहाण केली होती. अशा प्रकारे गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले दोघे मित्र सोबत रहात होते. प्रशांत कोळी याचे या चौकात महेंद्र महाजन याच्याकडे नेहमी येणेजाणे होते. त्यामुळे हॉटेल मालक प्रदिप चिरमाडे, बियर शॉपी मालक उमाकांत कोल्हे , चहा टपरी चालक महेंद्र महाजन व प्रशांत कोळी हे चौघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत होते. महेंद्र महाजन  व प्रशांत कोळी यांची दादागीरी या परिसरात सर्वश्रृत होती.  

12 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास पंकज वडनेरे व होमगार्ड दिपक जगताप हे दोघे जण त्याठिकाणी जेवण करण्यासाठी आले. सुरुवातीला काही वेळ सर्व काही सुरळीत सुरु होते. काही वेळाने प्रशांत भिवराज कोळी, महेंद्र अशोक महाजन व त्यांचा मित्र हेमंत संजय खैरनार असे तिघे चौकात एकत्र जमले. त्यांना आज काहीही करुन मद्याचा आस्वाद व तो देखील मोफत घ्यायचा होता. आपल्या दहशतीचा वापर करुन चौकातील उमेश बियर शॉपीतून बियरच्या बाटल्या घेण्यासाठी तिघे मित्र सरसावले. तिघा मित्रांच्या अंगात चांगलीच मस्ती संचारली होती. तिघांनी आपला मोर्चा उमेश बियर शॉपीच्या दिशेन नेला. जोरजोरात आरडाओरड व शिवीगाळ करुन त्यांनी परिसरात आपली दहशत माजवण्यास सुरुवात केली. उमाकांत कोल्हे या बियर शॉपी मालकाकडे जावून त्यांनी बियरच्या बाटल्यांची मागणी सुरु केली. उमाकांत कोल्हे यांच्याकडून सुरुवातीला त्यांना नकार मिळाला. त्यामुळे तिघांच्या दहशतीची तिव्रता अजून वाढली. त्यांनी उमाकांत कोल्हे यास मारहाण सुरु केली. त्यामुळे “नंगे से खुदा डरे” या उक्तीप्रमाणे घाबरलेल्या उमाकांत कोल्हे यांनी मुकाट्याने त्यांना दोन बियरच्या बाटल्या काढून दिल्या. त्या बाटल्यांचे पैसे मागण्याची हिंमत कोल्हे यांना झाली नाही. दहशतीच्या बळावर बियरच्या बाटल्या मिळाल्यामुळे त्यांची दादागिरी अजुनच वाढली. त्यांनी बियरच्या बाटल्या घेत हॉटेलच्या ओट्यावरच पिण्यास सुरुवात केली. तिघांच्या या प्रकारामुळे हॉटेलमधील कर्मचारी व ग्राहकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले. बियरच्या बाटलीचे झाकण उघडण्याऐवजी त्यांनी बाटलीच फोडून बियर पिण्यास सुरुवात केली. हा प्रकार हॉटेलमधील महिला कर्मचारी व ग्राहक तसेच हॉटेल मालक प्रदीप चिरमाडे बघत होते. तिघांच्या या प्रकाराकडे ग्राहक म्हणून आलेले पंकज वडनेरे व होमगार्ड दिपक जगताप हे दोघे बघू लागले.

दोघे जण आपल्याकडे निरखून बघत असल्याचा संशय तिघा मित्रांना आला. अगोदरच त्यांच्या अंगात दादागिरीचे चैतन्य आले होते. शिवाय त्यांच्या हातात दहशतीच्या बळावर मोफत मिळालेल्या बियरच्या बाटल्या होत्या. आपल्याकडे पंकज वडनेरे व दिपक जगताप निरखून  बघत असल्याच्या संशयातून तिघा मित्रांना राग आला. त्यांनी दोघांच्या तसेच इतर ग्राहकांच्या दिशेने फोडलेली बियरची बाटली फेकून  मारली. यात पंकज वडनेरे व दिपक जगताप हे दोघे मित्र सापडले.  पंकज वडनेरे यांना महेंद्र महाजन याने फुटलेली बियरची बाटली फेकून मारली. फुटलेल्या बाटलीची तिक्ष्ण किनार पंकजच्या गालावर लागली. त्यामुळे पंकजच्या गालावर खोल जखम झाली. दरम्यान प्रशांत कोळी व हेमंत खैरनार यांनी फुटलेली बाटली दिपक जगताप यास फेकून मारली. त्यात दिपकचा चेहरा व हात जखमी झाला. आता येथे थांबण्यात अर्थ नाही हे लक्षात घेत पंकज वडनेरे व दिपक जगताप यांनी तात्काळ दवाखान्यात धाव घेत वैद्यकीय उपचार सुरु केले.

या घटनेमुळे तिघांना अजूनच चेव आला. त्यांनी दिसेल त्याच्या अंगावर हॉटेलमधील खुर्च्या फेकून मारण्याचा उद्योग सुरु केला. त्यामुळे हॉटेलमधे दहशत पसरली. भेदरलेल्या महिला कर्मचा-यांच्या मनात भिती निर्माण झाल्यामुळे त्यांनी गोंगाट सुरु केला. दरम्यान शेजारचा बियर शॉपी मालक उमाकांत कोल्हे भितीपोटी दुकान बंद करुन पळून गेला. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तिघे जण दहशत माजवत होते. तुमची हॉटेल कशी चालते तेच आम्ही बघतो. उद्यापासून हॉटेल बंद झाली पाहिजे. हॉटेल सुरु असल्याचे दिसता कामा नये असा त्यांचा एकंदरीत सुर होता. हॉटेल मधे सुरु असलेली दहशत थांबवण्यासाठी हॉटेल मालक प्रदिप चिरमाडे मध्यस्ती करण्यासाठी पुढे आले.

हॉटेल मालक  चिरमाडे आपल्याला रोखण्यासाठी पुढे आल्याचे बघून त्यांना अजूनच चेव आला. त्यांनी आपला मोर्चा चिरमाडे यांच्याकडे वळवला. फुटलेली बाटली त्यांनी चिरमाडे यांच्या दिशेने फेकून मारली. ती बाटली थेट चिरमाडे यांच्या गळयावर फेकली गेली. थेट गळ्यावर वार झाल्यामुळे प्रदीप चिरमाडे यांच्या गळ्याची नस कापली गेली. त्यात ते जखमी झाले. दरम्यान तिघांचा मित्र निलेश पवार त्याठिकाणी आलेला होता. आता अती झाल्याचे बघून निलेश पवारच्या दुचाकीवर ट्रिपल सिट बसून प्रशांत कोळी व हेमंत खैरनार तेथून पसार झाले. त्यानंतर लागलीच महेंद्र महाजन हा हॉटेलच्या ओट्यावरुन उडी मारुन मागील बाजूने पळून गेला. पळून जातांना त्याने प्रदिप चिरमाडे यांना पुन्हा दम दिला की उद्यापासून तुझे हॉटेल बंद करतो. उद्यापासून याठिकाणी दिसता कामा नये.

प्रदिप चिरमाडे यांचा जिव वाचवण्यासाठी वेटर चेतन पवार याने त्यांना लागलीच आपल्या दुचाकीवर बसवून सरकारी दवाखान्यात नेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा गिरीष चिरमाडे हा देखील दवाखान्यात आला. वाटेतच प्रदिप चिरमाडे यांनी आपला जिव सोडला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी चिरमाडे यांना मयत घोषित केले.

या घटनेची माहीती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, शनीपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. विठ्ठल ससे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, हे.कॉ.हकीम शेख, संजय शेलार, रविंद्र पवार, रविंद्र पाटील, सलिम पिंजारी, अभिजीत सैंदाने, गिरीष पाटील, राहुल घेटे, राहुल पाटील, मुकुंद गंगावणे आदींनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेत कायदेशीर कारवाई व तपास सुरु केला. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला महेंद्र महाजन, प्रशांत कोळी, हेमंत खैरनार व निलेश पवार या चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गिरीष चिरमाडे यांच्या फिर्यादीनुसार गु.र.न.44/20 भा.द.वि.302, 307, 506, 507, 269, 188, 151 ब तसेच 34 नुसार दाखल करण्यात आला.

अतिरिक्त पोलिस अधिक्षक भाग्यश्री नवटके तसेच सहायक पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली  पो.नि. विठ्ठल ससे व त्यांचे सहकारी सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, हे.कॉ.हकीम शेख, संजय शेलार, रविंद्र पवार, रविंद्र पाटील, सलिम पिंजारी, अभिजीत सैंदाने, गिरीष पाटील, राहुल घेटे, राहुल पाटील, मुकुंद गंगावणे आदींनी आपली तपासचक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. रात्रीच चोघा संशयितांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांनी गुन्हयात वापरलेली दुचाकी तसेच तपासकामी गुन्हयतील रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले. चौघा संशयितांना दुस-या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान चौघांनी आपला गुन्हा कबुल केला. चोघे संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here