जळगाव : जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यासह चौघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान खरेदी करुन देण्यासाठी वेळोवेळी 3 कोटी 73 लाख रुपये घेतले परंतु दुकान दुसऱ्याच व्यक्तीला विक्री करत दोघांची फसवणूक केल्याचा खुबचंद साहित्या यांच्यासह चौघांवर आरोप करण्यात आला आहे. खुबचंद प्रेमचंद साहित्या, अनिल प्रेमचंद साहित्या, ममता अनिल साहित्या व नितीन खुबचंद साहित्या (सर्व रा. मोहाडी रोड, जळगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. महात्मा फुले मार्केटमधील कापड दुकानदार महेंद्र रोशनलाल नाथानी व त्यांचे बंधू आनंद नाथानी यांना दुकान खरेदी करायचे होते.
खुबचंद साहित्या यांनी गोविंदा रिक्षा स्टॉपनजीक असलेल्या संत बाबा हरदासराम कॉम्प्लेक्स या व्यापारी गाळ्यांच्या जागेचा सातबारा उतारा नाथानी यांना दाखवला. महेंद्र नाथानी यांनी खूबचंद साहित्या, अनिल साहित्या, ममता साहित्या व नितीन साहित्या यांना दुकान घेण्याची तयारी दाखवली. बोलणी झाल्यानुसार नाथानी यांनी 5 डिसेंबर 2017 रोजी के.पी. इन्फ्रास्ट्रक्चरच्या खात्यावर 10 लाख रुपये वर्ग केले. त्यानंतर नाथानी बंधूनी साहित्या यांना वेळोवेळी एकूण 3 कोटी 73 लाख रुपये दिले, मात्र सौदापावती करुन देण्यास टाळाटाळ केली. ही दुकाने दुस-याच व्यक्तीला विक्री झाल्याची माहिती नाथानी यांना दुय्यम निबंधक कार्यालयातून समजली. व्यापारी गाळा मिळत नाही अथवा दिलेली रक्कम देखील परत मिळत नाही हे बघून नाथानी यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशन गाठत खुबचंद साहित्या, अनिल साहित्या, ममता साहित्या व नितीन साहित्या अशा चौघांविरुद्ध 2 मार्च रोजी रितसर गुन्हा दाखल केला आहे.