जळगाव : रेल्वेच्या भुसावळ येथील झोनल ट्रेनिंग स्कूलच्या प्राचार्यासह क्लार्क अशा दोघांना नऊ हजार रुपयांच्या लाचेची देवाणघेवाण करतांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईने रेल्वे प्रशासनात खळबळ माजली आहे. प्राचार्य सुरेशचंद्र आणि क्लार्क योगेश देशमुख अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत.
रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग स्कूल येथे तक्रारदाराचे चारचाकी वाहन कंत्राटी तत्वावर लावण्यात आले आहे. या वाहनाच्या लॉग बुकवर सही करण्यासाठी तक्रारदार क्लर्क योगेश देशमुख यांच्याकडे गेले होते. मात्र सही करण्याच्या बदल्यात क्लार्क योगेश देशमुख याने तक्रारदाराकडे नऊ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम योगेश देशमुख याने स्विकारली आणि ती प्राचार्य सुरेश चंद्र यांना दिली. या घडामोडीवर लक्ष ठेवून असलेल्या पुणे येथील सीबीआयच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले.