नवी दिल्ली : ईडीने भारतात कार्यरत असलेल्या चिनी कंपन्यांवर छापा घालून एचएसबीसी बँकेचे चार अकाऊंट गोठवले आहेत. या अकाऊंट मधे 46.96 कोटी शिल्लक आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याचा छापा घालण्यात आलेल्या कंपन्यांवर आरोप आहे. ऑनलाइन जुगाराचा खेळ या कंपन्या चालवत असल्याचे आढळून आले आहे. ईडीने दिल्ली, गुरुग्राम, मुंबई तसेच पुणे या शहरात 15 ठिकाणी ही छापेमारी झाली. या एजन्सीच्या नोंदणीकृत कार्यालयांसह संचालक, सनदी लेखापाल यांच्या कार्यालयांवर देखील तपास यंत्रणेने छापा घातला.
या कारवाईत ईडीने 17 हार्ड डिस्क, 5 लॅपटॉप, फोन, आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. 4 बँक अकाऊंटमधील 46.96 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हैदराबाद पोलिसांच्या तक्रारीनुसार ईडीकडून आता चिनी कंपनी डोकाइप टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि लिंकन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध मनी लाँडरिंगचा तपास सुरु करण्यात आला आहे.
ईडीने डोकाइप टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन बँक अकाऊंटची तपासणी केली. या तपसणीत गेल्या वर्षी या खात्यात 1,268 कोटी रुपये शिल्लक होते, त्यापैकी 300 कोटी रुपये पेटीएम पेमेंट या गेट वेच्या माध्यमातून आले आणि 600 कोटी रुपये पेटीएम गेट वे च्या माध्यमातून बाहेर गेले. या अकाऊंटमधील 120 कोटी रुपयांचे अवैध पेमेंट झाला असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार अशा स्वरुपाचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत की ज्याला कोणताही आधार नाही. ऑनलाइन चायनीज डेटिंग अॅप्स चालवणार्या भारतीय कंपन्यांसोबत हे व्यवहार करण्यत आले आहेत. या कंपन्यांचा हवाला व्यवसायात देखील सहभाग असण्याचा दाट संशय ईडीला आहे. ईडी कडून आता ऑनलाइन व्हॅलेट कंपन्या आणि एचएसबीसीकडून माहिती संकलन सुरु आहे.
काही भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्सच्या सहकार्याने चिनी नागरिकांनी भारतात विविध कंपन्यांची निर्मीती केली असल्याचे समोर आले आहे. डमी भारतीय संचालक तैनात केल्यानंतर या कंपनीची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी हे चिनी नागरिक भारतात आले. त्यांनी या कंपन्यांचे संचालकपद आपल्या हाती घेतले.