जळगाव : पंचायत समिती पाचोरा येथील अधिका-यांसोबत आपली ओळख असून तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळवून देतो असे सांगून दहा हजाराची लाच मागणा-या खासगी इसमास एसीबी पथकाने आपल्या जाळ्यात ओढले असून त्याच्यविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हुसेन शेख बद्दु असे कु-हाड ता. पाचोरा येथील शेती व्यवसाय करणा-या लाचखोर खासगी इसमाचे नाव आहे.
या घटनेतील पाचोरा तालुक्यातील कु-हाड येथील तक्रारदाराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी माहिती घेण्यास सुरुवात केली होती. त्याअनुशंगाने स्थानिक खासगी इसम शेख हुसेन शेख बद्दू याने तक्रारदारास गाठले. माझी पंचायत समितीमधील अधिका-यांसोबत ओळख असून मी तुम्हाला मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करुन आणून देतो असे आमिष दाखवले. त्या बदल्यात शेख हुसेन याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदारास लाचेची रक्कम देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने एसीबी कार्यालय गाठून हुसेन याची तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे पडताळणी करण्यात आली. पडताळणीत तत्थ्य आढळून आल्याने लावलेल्या सापळ्यात हुसेन यास दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. शेख हुसेन याच्याविरुद्ध पिपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्यासह सापळा पथकातील सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, चापोहेकॉ सुरेश पाटील, पोना किशोर महाजन, पोना बाळू मराठे, पोकॉ प्रणेश ठाकूर यांनी सहभाग घेतला. त्यांना कारवाई पथकातील पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.कॉ. प्रदीप पोळ, पोकॉ अमोल सूर्यवंशी, पोकॉ राकेश दुसाने आदींनी सहकार्य केले.