जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या कारवाईत 73 लाख रुपयांच्या अंमली पदार्थाच्या मुद्देमालासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांचे कनेक्शन भुसावळ शहरासोबत असल्याचे उघड झाले आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. कुणाल भरत तिवारी (रा. प्लॉट नं. 24, तापी नगर, भुसावळ), जोसेफ जॉन वालाड्यारेस (रा. रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगांव रोड, भुसावळ) आणि दिपेश मुकेश मालवीय (रा. शेर ए पंजाब हॉटेल वरणगाव रोड भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
19 मार्च 2024 च्या रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील हॉटेल मधुबन परिसरात कुणाल भरत तिवारी आणि जोसेफ जॉन वालाड्यारेस हे दोघे जण मानवी जिवीतास अपायकारक असलेला Methaqualone हा अमली पदार्थ विना परवाना बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने स्वताच्या कब्जात बाळगतांना पोलिस पथकाला आढळून आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला पो.कॉ. प्रशांत निळकंठ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एन.डी.पी.एस. कलम. 8 (क), 21(क), 22 (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुणाल तिवारी आणि जोसेफ वालाड्यारेस हे दोघे जण हा अंमली पदार्थ बेकायदा विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने भुसावळ उप विभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या आदेशाने या छापा कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी त्यांच्या सहका-यांच्या मदतीने बनावट ग्राहक पाठवून पुढील कारवाई केली. अंगझडतीदरम्यान दोघांकडे मिळून आलेला 910 ग्रॅम वजनाचा पदार्थ हा रासायनिक तपासणीदरम्यान मानवी जिवीतास अपायकारक व अंमली असल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक तपासणीअंती जप्त करण्यात आलेला गुंगीकारक अमली पदार्थ दिपेश मुकेश मालवीया (रा. शेरे पंजाब हॉटेल वरणगाव रोड भुसावळ) याने विक्रीसाठी पुरवला असल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याला देखील तपासकामी अटक करण्यात आली आहे. एकंदरीत 73 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उप निरीक्षक मंगेश जाधव, डीबी अंमलदार पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकॉ निलेश चौधरी, पोहेकॉ रमण सुरळकर, पोहेकॉ यासीन पिंजारी, पोहेकॉ महेश चौधरी, पोकॉ. प्रशांत सोनार, पोकॉ. योगेश महाजन, पोकॉ राहुल महाजन, पो.कॉ. प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, जावेद शाह, राहुल वानखेडे, भुषण चौधरी, अमर आढाळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.