जळगाव : चाळीसगाव परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्याकामी मेहुणबारे येथील सराईत गुन्हेगार भिवा बाबुलाल गायकवाड यास स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची एक वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील सराईत गुन्हेगार भिवा बाबुलाल गायकवाड याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव अप्पर पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली.
हद्दपारी प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर गुन्हेगार भिवा गायकवाड यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. प्रस्ताव तयार करण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी हे.कॉ. युनूस शेख, जयंत चौधरी, रफीक शेख काळू आदींचे सहकार्य लाभले. मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक रमेश घडवजे, सहायक फौजदार शामकांत सोनवणे, पोलिस नाईक दीपक नरवाडे, पो.कॉ.गोरख चकोर, जितू परदेशी, सुदर्शन घुले व ईश्वर देशमुख आदींनी याकामी परिश्रम घेतले.