विम्याच्या रकमेसाठी स्वतःच्याच यंत्रांची चोरी उघडकीस

जळगाव : रावेर तालुक्यातील निंबोल येथील श्रीकृष्ण केला चिप्स फॅक्टरीतील पाच लाख रुपयांच्या विविध यंत्रांची चोरी झाल्याबाबत रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची फिर्याद स्वतः फॅक्टरी मालक नीरज सुनील पाटील यांनी दिली होती. मात्र विम्याच्या रकमेसाठी हा चोरीचा बनाव नीरज पाटील यानेच केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. फिर्यादीच आरोपी झाला असून त्याच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

नीरज पाटील याने चिप्स फॅक्टरीवर पाच लाखांचा विमा काढला होता. या रकमेचा फायदा घेण्यासाठी त्याने दोन नोकराच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि चोरी केली. त्यानंतर स्वतः पोलिसात हजर होऊन फिर्याद दिली.

रावेर पोलिसांनी या गुन्ह्यात तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज यांचा आधार घेत कारवाई केली. त्यात नीरज पाटील, उमेश शांताराम सुतार, कौशल जितेंद्र जंजाळकर (रा. रावेर) यांना पोलिस स्टेशनला आणून त्यांची सखोल चौकशी केली. त्यात त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here