धुळे : प्रवास भत्ता बिलाच्या रकमेच्या दहा टक्के 93 हजाराची लाच मागणी आणि 54 हजाराच्या लाचेचा स्विकार करणे धुळे जिल्ह्याच्या पिंपळनेर महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना चांगलेच महागात पडले आहे. 54 हजाराची लाच घेताना त्यांना एसीबी पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या लाच प्रकरणातील तक्रारदार पंचायत समिती साक्री अंतर्गत, महिला बालकल्याण केंद्र, पिंपळनेर येथे पर्यवेक्षिका या पदावर कार्यरत आहेत. तकारदार व त्यांचे इतर सहा कार्यालयीन सहकारी अशा सर्वांचे 9 लाख 37 हजार 533 रुपये एकत्रित प्रवास भत्त्याचे बिल मंजुर करण्यात आले होते . या प्रवास भत्त्याची रक्कम प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यानंतर श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावुन घेतले. प्रवास भत्ता मंजूर झालेल्या कर्मचा-यांचा प्रवास भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून दहा टक्क्याप्रमाणे एकुण 93 हजार रुपये जमा करण्यास सर्वांना बजावण्यात आले होते.
लाचेची 93 हजार रुपयाची रक्कम जमा करून दिली नाही तर यापुढे भविष्यात प्रवास भत्त्याची बिले काढून दिली जाणार नाही असे देखील श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी संबंधित सहकारी कर्माचा-यांना बजावले होते. त्यानंतर तक्रारदारांनी सहा मे 2024 रोजी लाच रुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे आपली तक्रार दाखल केली. एसीबी विभागाच्या पडताळणी अंतिम लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
तक्रारदार यांनी प्रवासभत्ता जमा झालेल्या काही कर्मचा-यांकडुन त्यांच्या जमा झालेल्या प्रवासभत्त्याच्या बिला प्रमाणे दहा टक्के अशी 54 हजार रुपयांची रक्कम जमा करून ती लाचेची रक्कम 7 मे रोजी शुभांगी बनसोडे यांना त्यांच्या कक्षात पंचासमक्ष देण्यात आली. लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना शुभांगी बनसोडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.