जळगाव : जळगावच्या सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स या सराफी दुकानावर सोमवारी सहा जणांनी 32 लाखाचा ऐवज लुटून नेला होता. या घटनेप्रकरणी एका संशयितास पुणे येथून ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. रेकी करुन हा गुन्हा घडला असल्याचे म्हटले जात आहे. ताब्यातील संशयिताकडून त्याच्या इतर साथीदारांची चौकशी आणि मुद्देमालाचा शोध सुरु आहे.
जळगाव शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स या दुकानातून सोमवारी भल्या पहाटेच्या वेळी तीन मोटार सायकलने आलेल्या सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. या घटनेत लुटारुंनी 25 लाख 47 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 6 लाख 50 हजारांच्या चांदीचे दागिने व 32 हजार रुपये रोख असा एकूण 32 लाख 29 हजार 574 रुपयांच्या ऐवजासह लुटारु पसार झाले होते. रेकी करुन स्थानिक इसमाच्या मदतीने हा गुन्हा घडल्याची जनतेत चर्चा सुरु आहे. त्यादृष्टीने देखील तपास सुरु असल्याचे समजते.