पुणे : केवळ तिन लाख रुपयांसाठी ससुन रुग्णालयाच्या दोघा डॉक्टरांनी पोर्शे अपघात प्रकरणातील चालक बाळाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, प्रथमोपचार विभागाचा प्रमुख डॉ. श्रीहरी हळनोर आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना 30 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी कार चालक बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉ. हळनोर याने बाळाच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले. मात्र डॉ. तावरेच्या सांगण्यावरुन त्याने रक्ताचे नमुने बदलले. डॉ. हळनोर याने घटनेच्या दिवशी अल्पवयीन आरोपी बाळाचा फिजिकल रिपोर्ट निगेटिव्ह दिला होता. अशा प्रकरणात आरोपीचा फिजिकल रिपोर्ट थेट निगेटिव्ह नाही, तर शक्यता आहे असा येत असतो. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चालक बाळाच्या रक्ताचे नमुने तपासणीकामी जिल्हा रुग्णालयात पाठवले.
एकाच रक्ताचे दोन अहवाल आल्यावर चालक बाळाच्या वडिलांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ससूनमधून आलेल्या चाचणीचा अहवाल जुळून आला नाही मात्र औंध येथील नमुने आणि वडिलांची डीएनए चाचणी या बाबी जुळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी डॉ. तावरे व हळनोर या दोघांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात बिल्डरपुत्र चालक बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य व्यक्तीच्या रक्ताचा नमुना डॉक्टरांनी घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.