जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार भुषण उर्फ भासा विजय माळी (24) रा. भुई काटयाच्या मागे, तुकारामवाडी, जळगाव यास एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार भुषण माळी याचेविरुद्ध बरेच गंभीर गुन्हे दाखल असून त्याची जळगाव शहराच्या तुकारामवाडी परीसरात प्रचंड दहशत होती. त्याच्या व त्याच्या टोळीच्या नावाची दहशत मोठया प्रमाणात निर्माण होण्यासाठी तो सामान्य नागरीकांना विनाकारण मारहाण करुन शिवीगाळ करत असे. त्याच्याविरुद्ध एकुण 13 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्हयांचा आलेख बघता त्याला यापुर्वी दोन वर्षासाठी हद्यपार करण्यात आले होते. हद्दपारीनंतर देखील त्याने पुन्हा त्याचे गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवले.
गुन्हेगार साथीदारांसह तुकाराम वाडी परिसरातील एका घरात घुसुन त्याने तोडफोड करत दहशत निर्माण केली होती. त्याच्या गुन्हेगारी कारवायांवर आळा बसण्यासाठी त्याच्याविरुध्द एमआयडीसी पो.स्टे. मार्फत एमपीडीए कायद्यार्तगत स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता मिळाली. त्याची मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर येथे स्थानबध्द होण्याकामी रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पो.उप.निरी. दिपक जगदाळे, पो.उप. निरी. दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, विनोद बोरसे, छगन तायडे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे तसेच स्था.गु.शा. चे स. फौ. युनुस शेख, पो.हे.कॉ. सुनिल दामोदर, मिलींद जाधव, वैभव पाटील आदींनी याबाबत प्रस्ताव तयार करण्याकामी सहभाग घेतला.