जळगाव : डाळींचा माल नियोजीत ठिकाणी न पोहोचवता त्या मालाची वाटेत परस्पर विक्री करुन फरार झालेल्या वाहन चालकास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अथक परिश्रम घेत अटक केली आहे. राजासिंग उर्फ राजा अग्नीदेवसिंग चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
तिलक रविंद्र काबरा या तरुण उद्योजकाची एमआयडीसी परिसरात राधाकृष्ण अॅग्रो इंडस्ट्रीज या नावाने डाळ मिल आहे. या डाळ मिल मधून पनवेल येथील संबंधीत व्यापा-यास 27 लाख 29 हजार 678 रुपये किमतीच्या डाळींचा माल रवाना करण्यात आला होता. हा माल पोहोचवण्याची जबाबदारी राजासिंग चव्हाण या ट्रेलर चालकावर होती. मात्र त्याने तो माल पनवेल येथे न पोहोचवता परस्पर विक्री करुन फरार झाला होता. याप्रकरणी डाळ मिल मालक तिलक काबरा यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चालक राजासिंग चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यचा तपास पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकाँ किरण पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, साईनाथ मुंढे आदींनी सुरु केला. या शोध पथकाने सलग तिन दिवस माग काढत फरार राजासिंग चव्हाण यास मध्यप्रदेशातील मरसराह सिधी या त्याच्या गावातील जंगलातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याच्या कब्जातून 40 लाख रुपये किमतीचे ट्रेलर जप्त करण्यात आले आहे. न्या. वसीम देशमुख यांच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
डाळीच्या मालाची राजासिंग याने भिवंडी शहरात विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. त्याच्यविरुद्ध यापुर्वी खूनाचा गुन्हा दाखल असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. किरण पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, साईनाथ मुंढे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.