जळगाव : घरात घुसून पैसे चोरण्याची सवय जडलेल्या चोरट्यास एमआयडीसी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. मोबीन खान युसुफ खान मुलतानी असे अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या अभिलेख्यावरील सराईत चोरट्या गुन्हेगाराचे नाव आहे. दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी मलिक नगर येथील रहिवासी अल्ताफ फकिरा पटेल यांच्या घरात घुसून त्यांच्या पॅंटच्या खिशातून मोबीन खान याने बारा हजार रुपयांची चोरी केली होती.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अल्ताफ पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यावर सराईत गुन्हेगार मोबीनखान युसूफखान मुलतानी हा बाहेरगावी निघून गेल्याचे पोलिस पथकास समजले. त्यामुळे त्यानेच हा गुन्हा केल्याचा संशय गुन्हे शोध पथकातील पोलिसांना आला. त्याच्या मागावर राहून तो घरी आल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीअंती हा चोरीचा गुन्हा त्याने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने केल्याचे कबुल केले. त्या अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अटकेतील मोबीन खान मुलतानी याच्या कब्जातून चोरीच्या बारा हजार रुपयांपैकी पाच हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील उप निरीक्षक दिपक जगदाळे, पो.ना. किशोर पाटील, योगेश बारी, पो.कॉ. किरण पाटील, नाना तायडे, चंद्रकांत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.