जळगाव : बस स्थानकातून रोख रकमेसह दागिने असलेली हरवलेली बॅग चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोधून काढली. या बॅगेचे मुळ मालक तथा तक्रारदाराने पोलिस पथकाचे आभार मानले आहे.
चाळीसगाव तालुक्याच्या पिंपरखेड येथील रहिवासी प्रदिप नारायणराव भोसले यांची बॅग 29 जून रोजी चाळीसगाव बस स्थानकात हरवली होती. या बॅग मधे 6200 रुपये रोख, एक मोबाईल, अंदाजे साडे तीन लाख रुपये किमतीची पाच तोळ्याची सोन्याची मंगलपोत असा त्यामधे ऐवज होता. याबाबत प्रदीप भोसले यांनी तात्काळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला माहिती दिली.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोउपनिरी सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोहेकॉ पंकज पाटील, पोहेकॉ अजय पाटील, पोकॉ निलेश पाटील, पोकॉ अमोल भोसले, पोकॉ नंदकिशोर महाजन, पोकॉ विनोद खैरनार, पोकॉ मोहन सुर्यवशी, पोकॉ विजय महाजन आदींनी या बॅगेचा शोध सुरु केला. दरम्यान पोकॉ ईश्वर पाटील व पोकॉ गौरव पाटील यांनी दिलेल्या तांत्रिक माहीतीच्या आधारे, शिरसगावचे पोलिस पाटील संदीप निकम तसेच गणेश चव्हाण यांच्या मदतीने हरवलेली बॅग हस्तगत करण्यात यश आले. मुद्देमालासह हरवलेली बॅग मुळ मालक तक्रारदारास देण्यात आली. अवघ्या दोन तासात बॅग परत मिळाल्याने प्रदीप भोसले यांनी पोलिस पथकासह सर्वांचे आभार मानले आहे.