जळगाव दि.०२ (प्रतिनिधी) – ‘केळी गुणवत्ता आणि उत्पादनात भारत देश अग्रस्थानी आहे. जागतिकस्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपण १८ व्या क्रमांकावर आहोत. आपल्यापेक्षा लहान देश निर्यातीत पुढे आहेत. गत वर्षाची भारताची केळी निर्यात २९०.९ मिलीयन डॉलर्स होती. केळीची निर्यात एक बिलीयनच्यावर कशी होईल, याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा जैन हिल्स येथे झालेल्या अपेडा केळी उत्पादक व निर्यातदार यांच्यासमवेत बैठकीत झाली. यासाठी पायाभूत सुविधांसह फ्रुटकेअर मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पॅक हाऊस, कोल्डस्टोअरेज, शेतातून पॅकहाऊस पर्यंत सुरक्षीत, जलद व कमी किंमतीत वाहतूक सुविधा निर्माण करण्याविषयी सुद्धा चर्चा झाली. जळगाव जिल्हा हा प्रमुख केळी उत्पादकांपैकी एक असून या परिसरात बडवाणी, बऱ्हाणपूर, नंदुरबार, धुळे, सुरत, नर्मदानगर आदी जिल्ह्यातील केळी उत्पादकांवर आधारित अर्थव्यवस्था मोठी आहे. यातून ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होतो; त्यादृष्टीने देशातील प्रमुख बनाना क्लस्टर पैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर असावे, यासाठी विशेष अहवाल तयार करुन स्वत: केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू’ असे आश्वासन अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी दिले.
अॅग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथोरिटी (अपेडा) व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. तर्फे कस्तुरबा सभागृह येथे आयोजित ‘बनाना ग्रोवर्स अॅण्ड एक्सपोटर्स मीट २०२४-२५’ मध्ये प्रमुुख अतिथी म्हणून अभिषेक देव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अपेडाचे व्यवस्थापक विनिता सुधांशू, महाराष्ट्र अपेडाचे प्रशांत वाघमारे, केळी उत्पादक संघाचे वसंत महाजन, अमोल जावळे, केळी निर्यातदारांपैकी आशिष अग्रवाल, किरण ढोके, केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत आरंभी दीपप्रज्वलन झाले. केळी उत्पादक असोसिएशनच्यावतीने डि.के. महाजन, वसंतराव महाजन, सचिन पाटील, ललित पाटील, संजीव देशमुख, संतोष लाचेरा, प्रेमानंद महाजन, दिगेंद्रसिंग भरुच यांच्याहस्ते अभिषेक देव यांचा सत्कार करण्यात आला. केळीचे झाड असलेली ट्रॉफी, शाल, सूतीहार असे सम्मानाचे स्वरुप होते.
अभिषेक देव बोलताना पुढे म्हणाले की, ‘आपण शेतात उत्पादन करतो ते गुणवत्तापूर्ण आहे का? त्यासाठी काय केले पाहिजे, आपण काय खातोय ते कुठून उत्पादन झाले आहे हे खाणाऱ्याला समजले पाहिजे. ग्लोबल गॅप, जैन गॅप तंत्रज्ञान त्यासाठी उपयुक्त ठरू पहात आहे. फ्रुट केअर मॅनेजमेंट, क्लिनींग, उत्पादन क्षमता वाढविणे, आंतरराष्ट्रीय मानांकानप्रमाणे निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी प्रयत्न करणे, ज्या अॅसेट आहेत त्या पुर्ण क्षमतेने उपयोग करणे. जैन इरिगेशन ही केळी उत्पादकांसह फळ-भाजीपाला निर्यात करू पाहणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अॅसेट आहे. अचूक तंत्रज्ञानाच्या वापरातून निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. इराण, इराक सह आखाती देशांसह रशिया, युरोप व अन्य देशात केळी निर्यातीला मोठी संधी आहे. त्यासाठी ब्रॅंडीग महत्त्वाचे आहे.’
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘वडील भवरलालजी जैन यांनी गांधी तीर्थ निर्माण केले गांधीजींनी ग्रामीण भारतात भविष्य बघितले. गांधीजींच्या या विचारांचा माझ्या वडिलांवर प्रभाव राहिला आहे. ‘ग्रामीण विकास घडला तर भारत विकास साध्य करेल’ हे त्यांचे विचार जैन इरिगेशन आपल्या कृतीतून साध्य करित आहे. अल्पभुधारक शेतकरी आर्थिक सक्षम व्हावा, यासाठी केळीवर संशोधन करुन १९९४ ला टिश्यूकल्चर तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले. जोडीला ठिबक सिंचन, फर्टिगेशन, प्रिसीजन फार्मिंग, क्रॉप केअर अग्रेसर काम केले आहे. यामुळे निर्यातक्षम केळी उत्पादन होऊ लागली. शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणि अधिकच्या उत्पादनामुळे सुबत्ता आली. तीस वर्षातील हा बदल म्हणजे खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव म्हणता येईल. केळी हे आरोग्य, रोजगार, विदेशी चलन मिळविण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण रोपांची व निर्यातक्षम वाणाची उपलब्ध हा महत्त्वाचा भाग आहे सोबत मूल्यवर्धन साखळीतील प्रत्येकाची सकारात्मक दृष्टी निर्यात वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरते.’
केळी निर्यात वाढविण्यासाठी केळीसाठी स्वतंत्र केळी मिशन कार्यक्रम आखण्यात यावा – विनिता सुधांशू यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ‘महाराष्ट्रातील शेतकरी हा तंत्रज्ञान आत्मसात करण्यात अग्रस्थानी आहे. त्यातून उत्पन्न वाढीसाठी ते प्रयत्न करतात जैन इरिगेशन सारख्या संस्था उच्च तंत्रज्ञानातुन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे कार्य करत आहे. अपेडाचे कार्य विस्तारीत असून ७०० च्यावर उत्पादनांमध्ये निर्यातीसंबंधित कार्य सुरू असते. केळीमध्ये गेल्या दहा वर्षात निर्यातीचा वाटा वाढला आहे. निर्यातीचा वाटा अजून वाढविण्यासाठी शेतकरी, निर्यातदार आणि जैन इरिगेशनचे सहकार्य अपेक्षित आहे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. निर्यात वाढविण्यासाठी शेतकरी, निर्यातदार, शासन व औद्योगिक संस्था यांच्यातील सुसंवाद वाढावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला.
शेतकरी व निर्यातदारांशी मुक्त संवाद – केंद्र सरकारने निर्यात वाढीसाठी धोरणात्मक दृष्टीने काय केले पाहिजे, त्यासाठी प्रश्नोत्तर स्वरुपात मुक्त संवाद शेतकरी व निर्यातदारांशी अभिषेक देव यांच्यासह अपेडाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यात शेतकऱ्यांनी निर्यातीसंबंधित तांत्रिक माहिती सहज उपलब्ध व्हावी, शेतकऱ्यांना प्रशिक्षीत केले पाहिजे, फ्रुटकेअर मॅनेजमेंट, पॅकिंग हाऊस, केळी उत्पादक परिसर व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे होईल त्याठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, कोल्ड स्टोअरची उभारणी, फ्रुट केअरला लागणाऱ्या साहित्यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर सबसिडी, करपा निर्मूलनाच्यादृष्टीने फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांसाठी अनुदानाची योजना पुन्हा सुरु करावी, केळीला आधारभूत किंमत एमएसपी जाहीर करावे अशा प्राथमिक स्तरावर सूचना शेतकऱ्यांनी दिल्या. निर्यातदारांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, चिनशी निर्यातीबाबत धोरण शिथिल करावे, इराण, इराक व आखाती देशांमध्ये आर्थिक व्यवहार मध्ये बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणावी, आठ दिवसांची केळी २० दिवसांवर जाण्यासाठी ग्रॅण्डनैन पेक्षा नवीन जातींवर संशोधन केले पाहिजे, नवीन मार्केटसाठी शासनस्तरावर सहकार्य व्हावे, रशिया, युरोप मध्ये निर्यात करायची असेल तर स्थानिक पातळीवर कोल्ड स्टोअर, स्कॅनर्स उपलब्ध करुन द्यावे, रेल्वे स्टेशनवर कंटेनर लोडींग व प्लगींगची व्यवस्था करावी, गुणवत्तेसाठी पॅकिंगमध्ये तंत्रज्ञान आणले तर केळीचा दर्जा सुधारेल अशा सूचना केल्या. अपेडाच्यावतीने प्रशांत वाघमारे, प्रिन्स त्रिपाठी एन एचबी, एश्वर्य गुप्ता उपस्थित होते. बऱ्हाणपूर, बडवाणी, नंदुरबार, जळगाव मधील साधारण ३०० केळी उत्पादक उपस्थित होते. प्रामुख्याने आशिष अग्रवाल, राजेंद्र पाटील, भागवत पाटील, प्रशांत महाजन, विशाल अग्रवाल, विशाल महाजन, भागवत महाजन, उमेश महाजन, बि. ओ. पाटील, अनिल पाटील, निर्यातदार अमीर करीमी, प्रशांत धारपुरे, युवराज शिंदे, महेश ढोके, शफी शेख, रविंद्र जाधव, अनिल परदेशी, प्रमोद निर्मळ, डॉ. अझहर पठाण यांचे सह २० निर्यातदार उपस्थीत होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. के. बी. पाटील यांनी केले. सहभागी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले गेले. राष्ट्रगीताने समारोप झाला.