जळगाव : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची मध्यप्रदेशातून आयात होत असल्याचे म्हटले जाते. महाराष्ट्रातील गुटखा माफियांनी तर आता मध्यप्रदेशात जावून गुटख्याचीच लुट केली आहे. केवळ लुटच नव्हे तर हाणामारी करुन गुटखा पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे. कुणी पैसे लुटून आणतो, कुणी सोने चांदी लुटून आणतो. मात्र आता तर थेट गुटखाच लुटण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या बुरहानपूर येथील आशिष बुधराणी या कथित गुटखा किंगच्या साईनाथ ट्रेडर्स या गोडाऊनवर हा धुमाकुळ आणि हाणामारीसह लुटीचा प्रकार रविवार दि. 30 जून रोजी घडला. बोरसे नावाच्या इसमाविरुद्ध शिकारपुरा पोलिस स्टेशनला भा.द.वि. 392 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी अधिकारी कमलसिंह पवार या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पान मसाला व गुटखा महाराष्ट्रात पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जाते. या उत्पादनांवर महाराष्ट्रात बंदी आहे. बुरहानपूरचे व्यापारी हा पान मसाला व गुटख्याचा महाराष्ट्रात पुरवठा करतात. रविवारी मध्यप्रदेशातील बुरहाणपूर येथील साईनाथ ट्रेडर्सचे मालक आशिष बुधराणी यांच्या गोदामात काही बदमाशांनी घुसून गोदामातील माल एका वाहनातून पूर्णपणे पळवून नेला. लुट करणा-यांचे वाहन महाराष्ट्रातील होते.
या घटनेत कथित गुटखा किंग आशिष बुधराणी याच्या कर्मचा-यांना दगड आणि चप्पलने मारहाण करण्यात आली. त्यामुळे या कर्मचा-यांनी घटनास्थळावरुन पळ काढल्यानंतरही त्यांना मारहाण सुरुच होती. एवढेच नव्हे तर त्यांना बळजबरी चारचाकी वाहनात डांबून नेण्यात आले. वाटेत त्यांना कुठेतरी सोडून देण्यात आल्याचे म्हटले जाते. या घटनेतील एका लुटारुस पकडण्यात मध्य प्रदेश पोलिसांना यश आले असून बोरसे असे त्याचे नाव असल्याचे समजते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या 25 जून रोजी गुटख्याचे एक वाहन पाळधी, जळगाव मार्गे अकोला येथे गेल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे खब-याने अगोदर पोलिस अधिक्षकांना व नंतर भुसावळ उप विभागचे पोलिस उप अधिक्षक कृष्णात पिंगळे यांना भुसावळ येथे ट्रॅप लावण्याची सुचना दिली होती. पोलिस भरतीच्या कामात मग्न असलेल्या डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी या वाहनास पकडण्यासाठी नशिराबाद येथे सापळा लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. नशिराबादचे स.पो.नि. रामेश्वर मोताळे व त्यांच्या सहका-यांनी अतिशय प्रामाणिकपणे या वाहनावर पाळत देखील ठेवली होती. दरम्यानच्या कालावधीत गुटख्याचे वाहन जामनेर मार्गे गेल्याचे समजले. नंतर खब-याने वेळोवेळी भुसावळ उप विभागाचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांना अपडेट कळवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र नंतर त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. त्यानंतर खब-याने याबाबत भुसावळ बाजारपेठ आणि मुक्ताईनगरच्या प्रभारी अधिका-यांना देखील कळवले. मात्र डीवायएसपी पिंगळे यांच्या फोन न उचलण्याने पुढील कारवाई संथ झाली. दरम्यान ते वाहन भुसावळ बाजारपेठ हद्दीतून गेल्याचे समजले.