जळगाव : पोलिस उप निरीक्षक राजेंद्र मनोहर उगले यांची नुकतीच सेवाजेष्ठतेनुसार पोलिस उप निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलिस उप निरीक्षक राजेंद्र उगले यांनी पोलिस अधिक्षक दीपक जोग यांच्या कार्यकाळात जळगाव पोलिस दलात पदार्पन केले.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील रोझे ही राजेंद्र उगले यांची जन्मभूमी. सन 1993 मधे या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे असावी. अशा या लहानशा गावातून राजेंद्र उगले हे सन 1993 मधे पोलिस दलात दाखल होण्याच्या महत्वाकांक्षेने जळगावला आले. त्याकाळी जळगाव शहर त्यांच्यासाठी अनोळखी होते. कुणीही नातेवाईक नाही. रोझे या गावाहून आणलेली शिदोरी आणि पोलिस दलात दाखल होण्याची जिद्द या दोनच गोष्टी सोबत असतंना त्यांनी पोलिस भरतीत बाजी मारली. जणू काही दोन रुपयांच्या केसपेपरवर उगले पोलिस दलात भर्ती झाले असा विनोद त्यावेळी तत्कालीन पोलिस अधिक्षक दीपक जोग यांनी केला होता.
जवळपास 31 वर्षाची सेवा बजावल्यानंतर राजेंद्र उगले यांना सेवाजेष्ठतेनुसार पोलिस उप निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. सध्या एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पीएसआय उगले यांनी जळगाव जिल्ह्यात विविध पोलिस स्टेशनला सेवा बजावली आहे. त्यात जळगाव शहर वाहतुक शाखा, पोलिस मुख्यालय, निंभोरा पोलिस स्टेशन, जिल्हापेठ, रामनंद आदी पोलिस स्टेशनचा समावेश आहे. निंभोरा पोलिस स्टेशनला कार्यरत असतांना पीएसआय उगले यांनी जवळपास सात ते आठ गावांना तंटामुक्तीची बक्षीसे मिळवून दिली आहेत. याशिवाय विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचा अंगरक्षक म्हणून देखील सेवा बजावली आहे. जळगाव शहर वाहतूक शाखेत कार्यरत असतांना सर्वाधिक केसेस केल्या. त्यामुळे उत्कृष्ठ कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक मिळाले असून जिल्हाधिका-यांच्या हस्ते सत्कार देखील झाला आहे.
पोलीस स्टेशनमध्ये काम करत असतांना गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळवून देता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला. या कामाचे फळ म्हणून आपण आज या पदापर्यंत पोहोचल्याची त्यांची भावना आहे. यापुढे देखील जनतेची सेवा आणि दुर्जनांचे निर्दालन करण्याचे काम प्रामाणीकपणे आपल्या हातून प्रामाणीकपणे केले जाणार असल्याचे मत राजेंद्र उगले यांनी व्यक्त केले आहे. आजपर्यंतच्या सेवा कार्यकाळात उगले यांच्याविरुद्ध कुठलाही कसुरी अहवाल अथवा दंडात्मक कारवाई झालेली नाही. कुठलीही सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या व पोलिस दलात उप निरीक्षक पदापर्यंत पोहोचलेल्या राजेंद्र उगले यांचे अभिनंदन होत आहे.