जळगाव : चोरीच्या 34 मोटारसायकलींसह दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. बोदवड पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीच्या तपासाअंती एका चोरट्याला ताब्यात घेतले असता त्याच्या दुस-या साथीदारचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांनी दिलेल्या कबुलीनुसार चोरीच्या तब्बल 34 मोटार सायकलींचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे (रा. वरणगाव ह.मु. न्यु हुडको कॉलनी भुसावळ) आणि त्याचा साथीदार रुपेश ज्ञानेश्वर चौधरी अशी दोघा मोटारसायकल चोरट्यांची नावे आहेत.
बोदवड पोलिस स्टेशनला 24 जून रोजी मोटार सायकल चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंगाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरुवातीला जितेंद्र सोनवणे यास ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याचा साथीदार रुपेश चौधरीचा देखील मोटार सायकल चोरीत सहभाग असल्याचे कबुल केले. दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची सखोल माहिती देत विविध गुन्ह्यांची कबुली दिली. बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव, नांदुरा, मलकापुर, जळगाव जामोद हद्दीतील गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. त्या माहितीच्या आधारे दोघांकडून 17 लाख रुपये किमतीचा 34 वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बोदवड पोलिसांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. |