जळगाव : दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत दोघा तरुणांनी फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य, लिखाण करुन सार्वजनीक शांतता भंग होणारे वर्तन केले आहे.
चाळीसगांव शहर तसेच जिल्हातील जातीय तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी दोघा जणांविरुध्द भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 126 प्रमाणे खटला तयार करुन तो चाळीसगाव कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
कुणीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पध्दतीची पोस्ट, व्हिडोओ, कमेन्ट, स्टोरी शेअर करु नयेत किंवा सार्वजनीक शांतता भंग होउन कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असे वर्तन करु नये असे आवाहन जळगाव पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
याशिवाय पालकांना देखील विनंती करण्यात आली आहे की अशा प्रकारचे वर्तन आपल्या पाल्यांकडुन होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. आपली मुले सोशल मिडीयाचा योग्य वापर करतात की नाही याबाबत लक्ष ठेऊन वेळोवेळी त्यांच्या ताब्यातील मोबाईल तपासावे. साधने चेक करतील. काही समाजकंटक अशा प्रकारे सार्वजनीक शांतता भंग करत असतील तर तो मजकुर शेअर न करता त्याबाबत तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला माहीती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.